इंदापूर – तरुणांमध्ये सामाजिक जाणीव, नेतृत्व क्षमता आणि उद्योजकीय कौशल्ये विकसित व्हावी यासाठी रोटरी इंटरनॅशनल दरवर्षी मे महिन्यात ‘युथ सर्व्हिस मंथ’ साजरा करते. या उपक्रमाच्या अनुषंगाने रोटरी क्लब ऑफ इंदापूर सेंट्रलने ‘युथ एक्सलन्स अवॉर्ड’ या उपक्रमाची सुरुवात केली आहे. समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तरुणांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या उपक्रमांतर्गत यंदाचा ‘युथ एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ इंदापूरचे युवा स्वयंसेवक आणि नवउद्योजक सागर हनुमंत कांबळे यांना प्रदान करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ इंदापूर सेंट्रलचे अध्यक्ष रो.ज्ञानदेव डोंबाळे यांच्या हस्ते सागर कांबळे यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला.
सागर कांबळे यांनी नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून राष्ट्रीय युवा स्वयंसेवक म्हणून ग्रामीण भागात शिक्षण, स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण आणि महिला सक्षमीकरण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर जनजागृती केली. यासोबतच, विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने बालसंगोपन, मतदान जनजागृती आणि सायबर सुरक्षा कार्यशाळांसारखे नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबवले. याव्यतिरिक्त, सागर कांबळे यांनी ‘RangPixel Graphics Studios’ या डिजिटल क्रिएटिव्ह एजन्सीच्या स्थापनेत महत्वाचे योगदान दिले आहे. या एजन्सी ने फ्रीलान्सिंग च्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या कॉलेजच्या शिक्षणासोबत आर्थिक मदत मिळवण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. सध्या सागर कांबळे इंदापूरमधील शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेमध्ये प्रकल्प अधिकारी म्हणून पूर्णवेळ कार्यरत आहेत आणि संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय योगदान देत आहेत.
रोटरी क्लब ऑफ इंदापूर सेंट्रलचे विद्यमान अध्यक्ष रो.ज्ञानदेव डोंबाळे हे स्वतः एक प्रेरणास्रोत आहेत. त्यांनी आपल्या संघर्षातून उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात एक विशिष्ट स्थान निर्माण केले आहे. ते नेहमीच युवा पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी तत्पर असतात.
या पुरस्काराच्या माध्यमातून रोटरी क्लब ऑफ इंदापूर सेंट्रलने एक सकारात्मक संदेश समाजात पोहोचवला आहे – ग्रामीण भागातील युवकांमध्येही नेतृत्व क्षमता, कल्पकता आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्याची तीव्र इच्छा असते. नवीन पिढीला प्रेरणा मिळावी आणि त्यांनी सामाजिक कार्याकडे आकर्षित व्हावे, यासाठी रोटरी क्लब ऑफ इंदापूर सेंट्रल भविष्यातही युवकांसाठी प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करत राहील.

