शंकरराव पाटील चरीटेबल ट्रस्ट च्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव डॉ.गिरीश देसाई, खजिनदार श्री.तुषार रंजनकर व विश्वस्त श्री.अरविंद गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली अल्फा बाईट कॉम्प्यूटर्सयेथील हॉल मध्ये करियर मार्गदर्शनविषयक एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) क्षेत्रातील सुप्रसिद्ध तज्ज्ञ, उद्योग मार्गदर्शक आणि ‘करियची गुणसूत्रे’ पुस्तकाचे सहलेखक डॉ. भूषण केळकर उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थी आणि पालकांसमोर करिअर आणि AI या महत्त्वाच्या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांना "करियची गुणसूत्रे" या मार्गदर्शक पुस्तकाचे मोफत वाटप करण्यात आले. डॉ. केळकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले, “AI भविष्यात अनेक नोकऱ्या संपवणार आहे, पण केवळ त्यांच्याच – ज्यांना AI वापरता येत नाही. म्हणूनच आजपासूनच AI शिकणे ही काळाची गरज आहे.” त्यांचे वक्तव्य उपस्थितांना नवचेतना देणारे ठरले.
कार्यक्रमात “करियची गुणसूत्रे” या पुस्तकाच्या सहलेखिका डॉ. मधुरा केळकर यांनी विद्यार्थ्यांना ध्यान, योग आणि मानसिक संतुलन यावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमध्ये मन:शांती आणि आत्मभान निर्माण होण्यासाठी हे सत्र उपयुक्त ठरले.
या कार्यक्रमात AI CLUB या नाविन्यपूर्ण उपक्रमाची अधिकृत घोषणा व उद्घाटन करण्यात आले. हा क्लब शंकरराव पाटील चरीटेबल ट्रस्ट व अल्फा बाईट कॉम्प्यूटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने चालवला जाईल. या क्लब अंतर्गत दर सोमवार सकाळी ११.३० वाजता विद्यार्थी एकत्र येऊन AI मधील नविन ट्रेंड्स, टेक्नॉलॉजी आणि यशोगाथा यावर चर्चा करतील. विविध क्षेत्रातील तज्ज्ञही या क्लबच्या माध्यमातून मार्गदर्शन करतील. हा उपक्रम ग्रामीण भागातील तरुणांना AI विषयक ज्ञान मिळवण्यासाठी एक सुवर्णसंधी ठरणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे खजिनदार श्री. तुषार रंजनकर यांनी केले. यावेळी AI CLUB बद्दल बोलताना ते म्हणाले कि, "AI म्हणजे केवळ तंत्रज्ञान नव्हे, तर नव्या संधींचा दरवाजा आहे. इंदापूरसारख्या ग्रामीण भागातील तरुणांनीही या परिवर्तनात सहभागी होणे गरजेचे आहे आणि AI क्लब ही त्याची सुरुवात आहे." कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे विश्वस्त श्री. अरविंद गारटकर यांनी केले.
या वेळी इंदापूर महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाचे प्रमुख प्रा. सदाशिव उंबरदंड, ट्रस्टचे इन्चार्ज श्री. दिपक जगताप, श्री. अमोल राऊत, श्रीमती चारुशीला शिंदे यांच्यासह १५० हून अधिक विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. केदार गोसावी व श्री. भारत माने यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. सागर कांबळे यांनी केले.
हा उपक्रम इंदापूरसारख्या ग्रामीण भागात AI च्या जनजागृतीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे.
