संस्थेच्या क्रीडारंग कला व क्रीडा महोत्सव २०२५ चा बक्षीस वितरण समारंभ संपन्न
इंदापूर: शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित "क्रीडारंग कला व क्रीडा महोत्सव २०२५" चा बक्षीस वितरण समारंभ आज, २३ जून २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव डॉ. गिरीश देसाई, खजिनदार श्री. तुषार रंजनकर आणि विश्वस्त श्री. अरविंद गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात अनेक कला आणि क्रीडा स्पर्धांचा समावेश होता, ज्यात निबंध लेखन, वक्तृत्व, चित्रकला, अभिवचन, प्रश्नमंजुषा, गायन,हस्ताक्षर, क्रिकेट आणि बुद्धीबळ यांचा समावेश होता. या स्पर्धांमध्ये सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
बक्षीस वितरण समारंभासाठी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे, संस्थेचे देणगीदार आणि रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे एज्युकेशनल डायरेक्टर श्री. वसंतराव मालुंजकर आणि प्रा. डॉ. शिवाजी वीर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात एकूण ३० विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली, तसेच १० गुणवंत विद्यार्थ्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्याची प्रशंसा केली. ते म्हणाले, “कर्मयोगी शंकरराव पाटील यांच्या कार्याचा वसा जपत श्रीमती पद्माताई भोसले यांनी ट्रस्टच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडते आणि त्यांच्यातील आत्मविश्वास वाढतो. त्याचबरोबर विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये ट्रस्ट ने केलेले कार्य हे वाखाणण्याजोगे आहे.” श्री. वसंतराव मालुंजकर यांनीहि संस्थेच्या कामाची व या उपक्रमाची प्रशंसा केली व रोटरी च्या माध्यमातून योग्य ती मदत मिळवून देण्याचे घोषित केले. "क्रीडारंग कला व क्रीडा महोत्सव २०२५" या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये केवळ स्पर्धात्मकताच नव्हे, तर सांस्कृतिक जाणीव, नेतृत्वगुण आणि संघभावना देखील निर्माण केली. अश्या भावना व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक खजिनदार श्री.तुषार रंजनकर यांनी तर आभार प्रदर्शन विश्वस्त श्री.अरविंद गारटकर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.सागर कांबळे यांनी केले. या कार्यक्रमप्रसंगी क्रीडारंग महोत्सवाचे परीक्षक श्री.राजेंद्र जाधव, संस्थेचे इन्चार्ज श्री.दिपक जगताप, केदार गोसावी हे उपस्थित होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी असे उपक्रम दिशादर्शक ठरतात आणि समाजोपयोगी कार्यासाठी ट्रस्टचा दृष्टिकोन अधिक प्रभावीपणे समाजासमोर येतो.
