इंदापूर (प्रतिनिधी): स्त्रियांना योग्य संधी आणि स्वातंत्र्य मिळाल्यास त्या आपले कर्तृत्व सिद्ध करतात, असे प्रतिपादन हभप शामसुंदर महाराज सोन्नर (मुंबई) यांनी केले. मुलींच्या लग्नाची घाई न करता, त्यांना शिक्षण आणि करिअरच्या आवडीनुसार निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्यावे; त्या नक्कीच यशस्वी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०३व्या जयंतीनिमित्त इंदापूर येथे आयोजित कीर्तन सोहळ्यात ते बोलत होते. इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या वतीने या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.
महाराज सोन्नर पुढे म्हणाले की, अहिल्यादेवी होळकर यांनी सर्व जात-धर्मातील लोकांसाठी काम केले आणि एक आदर्श राज्य कसे चालवावे याचा वस्तुपाठ घालून दिला. त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांनी त्यांना स्वतंत्र निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिल्यामुळेच त्या आपले कर्तृत्व सिद्ध करू शकल्या. ज्या ज्या वेळी स्त्रियांना स्वातंत्र्य मिळाले आहे, त्या त्या वेळी त्यांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे. यासाठी त्यांनी माँसाहेब जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्यासह अनेक ऐतिहासिक स्त्रीशक्तीची उदाहरणे दिली. स्त्रीशक्तीचे सामर्थ्य ओळखून प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलींना शिक्षण आणि व्यवसायात त्यांच्या आवडीनुसार निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
याप्रसंगी इंदापूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष प्रा. कृष्णा ताटे, हमीद अत्तार, महादेव चव्हाण, संतोष जामदार, गटनेते कैलास कदम, अशोक ननवरे, भारत बोराटे, वसंत जाधव, पांडुरंग सूर्यवंशी, इंदापूर अर्बनचे संचालक मच्छिंद्र शेटे, अविनाश कोथमिरे, राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्राचे सामाजिक न्याय विभागाचे सचिव संदिपान कडवळे, पोपट पवार, हरिदास सामसे, ज्येष्ठ नागरिक संघाचे दत्तात्रय गुजर, सुहास जौंजाळ हे उपस्थित होते. गायक अशोक टकले, सतीश बाबर, दिनेश गायकवाड, मुरलीधर चौरे, अर्जुन शिंदे, नंदकुमार खरवडे, मृदुंगाचार्य धर्माधिकारी, अमोल खराडे, ॲड. मयूर शिंदे तसेच श्रावण बाळ आश्रमातील बाल वारकऱ्यांनी कीर्तनाला साथ दिली. या कीर्तनाला मोठ्या प्रमाणात श्रोते उपस्थित होते, त्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

