इंदापूर (प्रतिनिधी): दक्षिण आफ्रिकेतील प्रतिष्ठेच्या कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये अभूतपूर्व यश मिळवून संतोष वाकचौरे, गोपीनाथ मोरे आणि संदीप जाधव यांनी इंदापूरसह संपूर्ण देशाची मान उंचावली आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ पत्रकार व नामवंत कीर्तनकार शामसुंदर महाराज सोन्नर यांनी काढले. या तिन्ही धावकांनी मिळवलेल्या यशाबद्दल इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.
शामसुंदर महाराज सोन्नर पुढे म्हणाले की, दुसऱ्या महायुद्धानंतर उद्भवलेल्या परिस्थितीनुसार कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात झाली. २०२५ सालच्या या स्पर्धेत इंदापूरमधील या तिघांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा सरळ रस्त्यांबरोबरच डोंगरदऱ्यांमधूनही होत असल्याने दक्षिण आफ्रिकेतील वातावरण आणि तेथील परिस्थितीवर मात करत या तिघांनी मिळवलेले यश खरोखरच अभिमानास्पद आहे. त्यांच्या या यशाने केवळ इंदापूरकरांचीच नव्हे, तर संपूर्ण भारताची मान जागतिक स्तरावर उंचावली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःचे नाव कमावले असून, या विजयामुळे त्यांचा आत्मविश्वास निश्चितच वाढला आहे. या बळावर भविष्यातही ते असेच यश संपादन करून देशाचा नावलौकिक वाढवतील, असा विश्वास शामसुंदर महाराजांनी व्यक्त केला.
यावेळी इंदापूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष कृष्णा ताटे, हमीद अत्तार, महादेव चव्हाण, संतोष जामदार, वसंत जाधव, नंदकुमार खरवडे, अर्जुन गायकवाड, फकीर पठाण, अफसर मोमीन, पांडुरंग सूर्यवंशी, इंदापूर अर्बनचे संचालक मच्छिंद्र शेटे, अविनाश कोथमिरे, राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्राचे सामाजिक न्याय विभागाचे सचिव संदिपान कडवळे, गटनेते कैलास कदम, अशोक ननवरे, पोपट पवार, हरिदास सामसे, ज्येष्ठ नागरिक संघाचे दत्तात्रय गुजर, सुहास जौंजाळ, सतीश बाबर, दिनेश गायकवाड, मुरलीधर चौरे, मृदुंगाचार्य धर्माधिकारी, अमोल खराडे, ॲड. मयूर शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

