शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट ने यावर्षीच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवात संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव डॉ.गिरीश देसाई, खजिनदार श्री.तुषार रंजनकर व विश्वस्त श्री.अरविंद गारटकर याच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. उपक्रमांच्या या साखळीमध्ये गौरी आवाहनाचा सोहळा यंदा एक वेगळाच रंग घेऊन आला. सामाजिक कार्य आणि उत्कृष्ट कामगिरीमुळे समाजात आदर्श ठरलेल्या महिलांचा या दिवशी सन्मान करण्यात आला. हा सन्मान सोहळा म्हणजे महिलांच्या कर्तृत्वाला दाद देणारा आणि समाजातील त्यांच्या योगदानाची जाणीव करून देणारा एक सोनेरी क्षण ठरला.
या गौरवशाली प्रसंगी सौ. लताताई नायकुडे ज्यांना नुकताच नागरी सन्मान मिळाला आहे त्यानिमीत्त त्यांना गौरविण्यात आले. सामाजिक क्षेत्रातील त्यांचे कार्य म्हणजे समाजासाठी प्रेरणादायी दीपस्तंभ आहे. सौ. सायरा अत्तार यांना ज्यांना नुकताच पर्यावरण सेवा पुरस्कार मिळाला आहे त्यानिमीत्त त्यांचा सन्मान करण्यात आला. पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे आज अनेकांना हरित जीवनशैली स्वीकारण्याची प्रेरणा मिळत आहे. तसेच कु. अंजली जाधव यांना उत्कर्ष राज्यस्तरीय स्पर्धेची विजेती व गोल्डन गर्ल पुरस्काराची मानकरी म्हणून सन्मानित करण्यात आले. इंदापूरसारख्या ग्रामीण भागातून संगीत क्षेत्रात विशारद मिळवत राज्यस्तरावर झेप घेत त्यांनी अनेक युवतींसाठी आदर्श निर्माण केला आहे.
हा सन्मान समारंभ संस्थेचे विश्वस्त मा. श्री. अरविंद गारटकर सर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान भक्तिभावाने श्रीगणेशाची आरती करण्यात आली आणि मंगलमय वातावरण निर्मिती झाली.
विशेष म्हणजे संस्थेचे खजिनदार मा. श्री. तुषार रंजनकर सर यांनी स्वतः लिहिलेले “मोबाईल व्यसनमुक्ती” हे पुस्तक उपस्थितांना भेट देण्यात आले. आधुनिक काळात वाढणाऱ्या मोबाईल व्यसनावरील हे पुस्तक समाजाला दिशा देणारे आणि विशेषतः युवकांसाठी जीवनमूल्य जपणारे ठरेल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला. या उपक्रमाने ट्रस्टने पुन्हा एकदा दाखवून दिले की धार्मिक उत्सव हा केवळ भक्तीचा नाही तर समाजपरिवर्तनाचा आणि प्रेरणेचा उत्सव ठरू शकतो.
