मुंबईत मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी हैदराबाद गॅझेटियरचा आधार घेण्याची प्रमुख मागणी मान्य केली आहे. या निर्णयामुळे मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला असून, जरांगे-पाटील यांनी आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली आहे.
सरकारकडून तासाभरात जीआरची तयारी
मनोज जरांगे-पाटील यांनी आंदोलकांसमोर बोलताना सांगितले की, मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या असून, सरकार लवकरच यासंदर्भात शासकीय अध्यादेश (जीआर) काढणार आहे. "तुमच्या ताकदीवर आपण हे यश मिळवले आहे. सरकारने तासाभरात सर्व जीआर काढून ते आम्हाला द्यावेत. एकदा जीआर हातात आल्यावर आपण हा आनंद साजरा करत मुंबईतून बाहेर पडू," असे जरांगे-पाटील यांनी स्पष्ट केले. सरकारने सर्व मागण्या मान्य केल्याचा जीआर तात्काळ काढल्यास रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई पूर्णपणे खाली करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
दोन स्वतंत्र जीआरची मागणी
जरांगे-पाटील यांनी यावेळी सरकारकडे दोन वेगवेगळ्या जीआरची मागणी केली आहे. एक जीआर हैदराबाद गॅझेटियर आणि सातारा येथील नोंदींसाठी असावा, तर दुसरा जीआर मराठा समाजाच्या इतर मागण्यांसाठी असावा, अशी त्यांची मागणी आहे. या दोन्ही जीआरची खात्री झाल्यावरच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, असे ते म्हणाले.
मराठा समाजाचा मोठा विजय
गेले काही दिवस मुंबईच्या वेशीवर ठाण मांडून बसलेल्या जरांगे-पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू ठेवले होते. अखेर त्यांच्या या संयमाला आणि मागणीला यश आले आहे. सरकारने हैदराबाद गॅझेटियर स्वीकारल्याने आता मराठा समाजाला कुणबी म्हणून ओळख मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे मराठा समाजाला इतर मागासवर्गीयांप्रमाणे (ओबीसी) आरक्षणाचा लाभ मिळू शकणार आहे. सरकार आणि आंदोलक यांच्यातील सकारात्मक चर्चेनंतर हा तोडगा निघाला असून, यामुळे मुंबईतील तणावही कमी झाला आहे. लवकरच गुलाल उधळून या विजयाचा जल्लोष साजरा केला जाईल, असे जरांगे-पाटील यांनी सांगितले.

