इंदापूर - गणेशोत्सवाच्या उत्साहात माजी सहकार आणि संसदीय कार्यमंत्री श्री. हर्षवर्धन पाटील यांनी शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टला सदिच्छा भेट दिली तसेच त्यांच्या हस्ते श्रीगणेशाची आरती करण्यात आली. यावेळी त्यांनी संस्थेच्या शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास आणि सामाजिक जनजागृती यांसारख्या विविध क्षेत्रांतील कार्याचा सखोल आढावा घेतला. त्यांनी संस्थेच्या प्रत्येक विभागाला भेट देऊन सुरू असलेल्या उपक्रमांची सविस्तर माहिती घेतली.
या भेटीदरम्यान, संस्थेमार्फत दर महिन्याला प्रकाशित होणाऱ्या ‘संवाद’ या माहितीपत्रिकेच्या ऑगस्ट २०२५ महिन्याच्या अंकाचे प्रकाशन श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेच्या उपक्रमांचे सातत्य, त्यांची व्यापकता आणि समाजावर होणारा सकारात्मक परिणाम पाहून श्री. पाटील यांनी संस्थेचे मनापासून कौतुक केले.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव डॉ.गिरीश देसाई, खजिनदार श्री.तुषार रंजनकर व विश्वस्त श्री.अरविंद गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करत आहे, ज्याची संकल्पना ‘मोबाईल व्यसनमुक्ती’ अशी ठेवण्यात आली आहे. या संकल्पनेचे कौतुक करताना श्री. पाटील म्हणाले की, "मोबाईलचे व्यसन हा आजच्या तरुण पिढीपुढील एक गंभीर आणि ज्वलंत प्रश्न आहे." या व्यसनामुळे शैक्षणिक प्रगतीसोबतच मानसिक आणि सामाजिक आरोग्यावरही दुष्परिणाम होत आहेत, असे त्यांनी अधोरेखित केले. यावर जनजागृती करण्याची गरज व्यक्त करत त्यांनी संस्थेच्या या उपक्रमाला ‘काळाची गरज’ म्हटले.
यावेळी संस्थेचे विश्वस्त श्री. अरविंद गारटकर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख श्री. महादेव चव्हाण, कोपिवरची शाळा प्रमुख श्री. भारत बोराटे, कार्यकर्ते श्री. हमीदभाई अत्तार, इन्चार्ज श्री. दिपक जगताप, प्रकल्प अधिकारी श्री. सागर कांबळे, जावेद हबीब विभाग प्रमुख श्री. अमोल राऊत आणि फॅशन विभाग प्रमुख सौ. त्रिशाला पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रोहिणी जाधव, केदार गोसावी आणि मानसी पाटील यांचे सहकार्य लाभले.
