इंदापूर: शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, इंदापूर आणि अक्षरभारती, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'दुसरे बालसाहित्य संमेलन २०२६' नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले. १० आणि ११ जानेवारी २०२६ रोजी संपन्न झालेल्या या संमेलनाचे आयोजन ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव डॉ. गिरीश देसाई, खजिनदार श्री. तुषार रंजनकर, विश्वस्त श्री. अरविंद गारटकर आणि अक्षरभारतीचे संस्थापक श्री. माधव राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या सोहळ्याचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ लेखक श्री. भारत सासणे यांच्या हस्ते झाले, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते श्री. आबा महाजन संमेलनाध्यक्ष म्हणून, तर श्री. तुषार रंजनकर स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
संमेलनाची सुरुवात पारंपारिक आणि मंगलमयी ग्रंथदिंडीने झाली. पहिल्या दिवशीच्या विविध सत्रांमध्ये प्रकाश पारखी, मकरंद गोंधळी, अनिल गुंजाळ, संजय ऐलवाड आणि डॉ. सूर्यकांत सराफ यांसारख्या दिग्गज लेखकांनी आणि वक्त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना साहित्याच्या विश्वाची ओळख करून दिली. पहिल्या दिवसाचा समारोप रंगतदार नृत्य स्पर्धांनी झाला, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपला कलाविष्कार सादर केला. दुसऱ्या दिवसाची सुरुवात लहान मुलांसाठीच्या मजेशीर खेळांनी (फनी गेम्स) झाली, तर दुपारच्या सत्रात वेशभूषा स्पर्धेने रंगत आणली. या दोनही दिवशी 'पुस्तकविश्व' तर्फे पुस्तक प्रदर्शन आणि वैज्ञानिक खेळण्यांचे प्रदर्शन खास आकर्षण ठरले.
संमेलनाचा समारोप बक्षीस वितरण समारंभाने झाला. या कार्यक्रमासाठी स्टारा जीनच्या सीईओ युजीन हान गुप्ता प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या, तर डॉ. गिरीश देसाई यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. या संमेलनात इंदापूर परिसरातील १० शाळांमधील १,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून, एकूण २०८ विद्यार्थ्यांना त्यांच्या नैपुण्याबद्दल सन्मानित करण्यात आले. मुलांमध्ये बालवयातच साहित्य, कला आणि संस्कृतीचे संस्कार रुजवणारे हे संमेलन अत्यंत प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थित पालक व शिक्षकांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संतोष नरुटे यांनी केले.
या सोहळ्याला माजी शिक्षणाधिकारी पोपट काळे, पोलीस निरीक्षक विलास नाळे, पुस्तकविश्व चे संस्थापक श्री.नवनाथ जगताप, अक्षरभारती चे विश्वस्त श्री.नागेश चव्हाण, डॉ.अविनाश सांगोलकर, जयवंत नायकुडे, संस्थेचे कार्यकर्ते महादेव चव्हाण, भारत बोराटे, हमीद आतार, आदित्य राखुंडे यांच्यासह संस्थेचे इन्चार्ज दिपक जगताप, प्रकल्प अधिकारी सागर कांबळे आणि अमोल राऊत, त्रिशला पाटील, केदार गोसावी, रोहिणी जाधव व मानसी पाटील तसेच संस्थेचे हितचिंतक, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

