इंदापूर : निरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊसतोड मजुरांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने, शिरसटवाडी आणि हागारवाडी गावाच्या परिसरातील १०० मजुरांची मोफत आरोग्य तपासणी संपन्न झाली. गुरुवार, दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र, इंदापूर मार्फत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मजुरांच्या वास्तव्याच्या ठिकाणी जाऊन त्यांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.
या आरोग्य तपासणी शिबिराचा शुभारंभ निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन श्री. लालासाहेब देविदास पवार यांच्या शुभहस्ते झाला. यावेळी काटी गटाचे प्रमुख भागवत खंडेराव पाटील, चिटबॉय सचिन घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते मजुरांच्या तपासणीला सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना लालासाहेब पवार म्हणाले की, ऊसतोड मजूर हा कारखान्याचा मुख्य कणा आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे आपले कर्तव्य असून, थेट बांधावर जाऊन ही सेवा पुरवली जात आहे.
शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हा उपक्रम गेली ६ वर्षे अविरतपणे राबवला जात आहे. ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव डॉ. गिरीश देसाई, खजिनदार तुषार रंजनकर आणि विश्वस्त अरविंद गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी होत आहे. मराठवाडा आणि विदर्भातून पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या या मजुरांची सेवा हीच ईश्वर सेवा मानून ट्रस्ट काम करत आहे. "गोरगरिबांची सेवा" हे ध्येय समोर ठेवून राबवलेला हा उपक्रम खरोखरच वाखण्याजोगा असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या मोहिमेचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे करण्यात आले आहे. दररोज कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील दोन ते तीन गावांमध्ये जाऊन आरोग्य तपासणी केली जाते. विशेष म्हणजे, दिवसा ऊसतोडीच्या ठिकाणी आणि सायंकाळी कारखान्याच्या परिसरातील मजुरांच्या कोप्यांवर (झोपड्यांवर) जाऊन ही सेवा दिली जाते. आरोग्य केंद्राचे प्रमुख महादेव चव्हाण, डॉ. सारंगी कुंभार आणि हनुमंतराव गोफणे यांच्या देखरेखीखाली हे केंद्र कार्यरत आहे. यामध्ये तपासणीसह आवश्यक औषधोपचारही मोफत पुरवले जात आहेत.
आरोग्य तपासणी केंद्राच्या प्रमुख डॉ. सारंगी कुंभार आणि त्यांच्या नर्स व इतर सहकाऱ्यांच्या मदतीने ही मोहीम जोमाने सुरू आहे. ऊसतोड मजुरांना कामाच्या व्यापांमुळे दवाखान्यात जाणे शक्य होत नाही, अशा परिस्थितीत ही सेवा त्यांच्या दारात आल्याने त्यांना मोठा आधार मिळाला आहे. निरा भीमा कारखान्याने केवळ साखर उत्पादनच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी म्हणून मजुरांच्या आरोग्याचा जो प्रश्न हाती घेतला आहे, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

