इंदापूर प्रतिनिधी- गणेश धनवडे
निमसाखर: इंदापूर तालुक्यातील निमसाखर गावामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा अतिशय उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने गावात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये पंचक्रोशीतील स्वामीभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पौर्णिमेचे औचित्य साधून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांची पालखीतून भव्य ग्राम प्रदक्षिणा काढण्यात आली. या पालखी सोहळ्याला महादेव भजनी मंडळ, निमसाखर यांनी आपल्या अभंगवाणीने आणि टाळ-मृदंगाच्या गजराने विशेष रंगत आणली. गावातील महिलांनी ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढून आणि फुलांची उधळण करून पालखीचे स्वागत केले. या पालखीसाठी लागणाऱ्या फुलांची नयनरम्य सजावट श्री. राजेंद्र मारुती घोडे यांच्या वतीने करण्यात आली होती.
ग्राम प्रदक्षिणेनंतर पालखीचे मंदिरात आगमन झाले. यावेळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा सामूहिक जप आणि आरती करण्यात आली. यावेळच्या आरतीचे मानकरी श्री. संतोष ज्ञानदेव पवार हे होते, त्यांच्या हस्ते विधिवत आरती संपन्न झाली. महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.
कार्यक्रमाच्या शेवटी श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, निमसाखर यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या अन्नदानासाठी भाविकांनी दिलेल्या देणगीचा विनियोग करण्यात आला. याकामी श्री. नामदेव साहेबराव अर्जुन, श्री. बापूराव ज्ञानदेव कदम, श्री. किरण प्रतापराव रणवरे आणि श्री. महादेव मारुती माळी यांचे विशेष सहकार्य लाभले. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या सोहळ्यामुळे निमसाखर गावात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.
