इंदापूर: राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून इंदापूर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागातर्फे २८ फेब्रुवारी २०२६ रोजी 'मानसिक आरोग्य जनजागृती' या विषयावर पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे आणि कला शाखाप्रमुख डॉ. भरत भुजबळ यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. विज्ञानाच्या प्रगतीसोबतच मानवी मनाचे आरोग्य जपणे ही काळाची गरज असल्याचे या प्रदर्शनातून अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रा. एस. एम. शिंदे यांनी मानसिक आरोग्याचे वाढते महत्त्व विशद केले. सध्याच्या काळात तरुणांमध्ये जाणवणारी नैराश्याची भावना, वाढती आत्महत्येची समस्या आणि त्यावर करावयाच्या उपाययोजनांबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. या प्रदर्शनाचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे आणि त्यांना मानसिक संघर्षातून बाहेर काढण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन देणे हा असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची कल्पकता आणि समाजाभिमुख दृष्टीकोन विकसित होतो. त्यांनी मानसशास्त्र विभागाला महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा मानसिक आरोग्यविषयक अभ्यास करण्याचे विशेष आवाहन केले. मान्यवरांनी प्रदर्शनातील प्रत्येक पोस्टरला भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि भविष्यातही अशा प्रकारचे शैक्षणिक व जनजागृतीपर कार्यक्रम राबवण्याची अपेक्षा व्यक्त केली.
डॉ. भरत भुजबळ यांनी मानसिक आरोग्याचा दैनंदिन जीवनातील संबंध स्पष्ट केला. अशा प्रदर्शनांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणि वैज्ञानिक विचारसरणीला योग्य दिशा मिळते, असे मत त्यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकी ज्ञान न घेता, दैनंदिन जीवनात वैज्ञानिक दृष्टीकोन आणि संशोधनात्मक वृत्ती जोपासावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची ओढ निर्माण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास संशोधन समन्वयक डॉ. राजेंद्र भोसले, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ. सुरेंद्र शिंदे, डॉ. महम्मद मुलाणी यांच्यासह प्रा. सचिन खरात, प्रा. विद्या गायकवाड, प्रा. मनीषा गायकवाड, प्रा. सिध्दी बोराटे व प्रा. निलम माने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सिध्दी बोराटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. निलम माने यांनी केले. हे पोस्टर प्रदर्शन ८ मार्च २०२६ पर्यंत मानसशास्त्र विभागात सर्वांसाठी खुले राहणार असून, याचा लाभ घेण्याचे आवाहन प्रा. श्रीनिवास शिंदे यांनी केले आहे.
