इंदापूर: डॉ. संदेश शहा
पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील हर्ष प्रतीक शिंदे यांनी राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत कठीण मानली जाणारी 'इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया' (ICAI) ची सनदी लेखपाल (सी.ए.) फायनल परीक्षा उत्तीर्ण केली आहे. या यशाने हर्ष यांनी इंदापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून, सनदी लेखपाल सारख्या प्रतिष्ठेच्या पदावर त्यांची मोहोर उमटवली आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
हर्ष शिंदे यांच्या शैक्षणिक प्रवासाचा पाया इंदापुरातच रचला गेला. त्यांचे पूर्व प्राथमिक शिक्षण गारटकर इंग्लिश मीडियम स्कूल येथे झाले, तर प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल इंदापूर येथे पूर्ण झाले. पुढील उच्च माध्यमिक व वाणिज्य पदवीचे शिक्षण त्यांनी पुणे येथील नामांकित मराठवाडा मित्र मंडळाच्या महाविद्यालयात घेऊन सी.ए. होण्याचे आपले स्वप्न साकार केले.
हर्ष हे इंदापूर येथील एल.आय.सी.चे सेवानिवृत्त विकास अधिकारी प्रतीक सुधाकर शिंदे यांचे चिरंजीव आहेत. एका सामान्य पार्श्वभूमीतून येत, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांच्या यशात त्यांच्या पालकांचे मार्गदर्शन आणि पाठबळ मोलाचे ठरल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
हर्ष शिंदे यांच्या या यशाबद्दल इंदापूरमधील मान्यवरांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे. यामध्ये सद्गुरू असोसिएटचे संस्थापक डॉ. श्रेणिक शहा, देवराज जाधव, वसंतराव माळुंजकर, आझाद पटेल, संदीप शहा, संदीप पांढरे आणि डॉ. संदेश शहा आदींनी हर्ष यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तसेच, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संचलित पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा संघटक राजेंद्र कवडे देशमुख यांनी देखील हर्ष शिंदे यांच्या यशाची दखल घेत त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. इंदापूरच्या एका तरुणाने राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश आगामी पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
