इंदापूर, डॉ. संदेश शहा.
परमपूज्य योगऋषी स्वामी रामदेवजी महाराज यांच्या अथक प्रयत्नांमुळे योगाचा प्रसार संपूर्ण जगभर झाला असून, २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. या पार्श्वभूमीवर बाराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त इंदापूर तालुक्यात ८३ ठिकाणी २६५९८ विद्यार्थी, युवक युवती तसेच नागरिकांनी योग प्रात्यक्षिकांचा लाभ घेतला. यामुळे संपूर्ण तालुक्यात योग सप्ताह राबविण्यात आला असून संपूर्ण तालुका योगमय झाला होता.
पतंजली योग समिती, इंदापूरचे तहसिल प्रभारी दत्तात्रय अनपट यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या २२ वर्षांपासून निरंतर निशुल्क योग सेवा सुरू असून, योगाभ्यास व योग जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. यावर्षीच्या योग दिनानिमित्त विविध योगासने, प्राणायाम, ध्यान तसेच योगाचे आरोग्यदायी फायदे याविषयी सर्वांना मार्गदर्शन करण्यात आले. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक स्वास्थ्य सुधारण्यास मोठी मदत होते, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. या उपक्रमात इंदापूर तालुक्यातील विविध शाळा,विद्यालये महाविद्यालये तसेच विविध सामाजिक संस्था अशा एकूण 83 ठिकाणी पतंजली योग समितीच्या योग शिक्षकांनी जाऊन सुमारे २६५९८ विद्यार्थी, शिक्षक व पालकांना योगा विषयी मार्गदर्शन केले.
योग दिनाच्या यशस्वी आयोजनासाठी पतंजली योग समिती इंदापूर अंतर्गत सुरू असलेले इंदापूर शहरातील सर्व योग वर्ग, तसेच ग्रामीण भागात सुरु असलेले कालठण नं. १ येथील दोन योग वर्ग, गलांडवाडी नं.१, गलांडवाडी नं. २, शिरसोडी, कळाशी, भिगवन येथील योग वर्गातील योगशिक्षकांनी विविध शाळा,विद्यालये, महाविद्यालये व विविध सामाजिक संस्था इत्यादी ठिकाणी भेटी देऊन योग प्रात्यक्षिके, मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रम राबविले. यामुळे योगाचा संदेश समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचविण्यात महत्त्वपूर्ण योगदान मिळाले. सदर योग दिन उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी पतंजली योग समिती इंदापूर, महिला पतंजली योग समिती इंदापूर, भारत स्वाभिमान, किसान सेवा समिती, युवा भारत, सोशल मीडिया विभाग तसेच सर्व पदाधिकारी, योग शिक्षक आणि स्वयंसेवक यांचे मोलाचे योगदान लाभले.

