इंदापूर: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून (महावितरण) ग्राहकांच्या संमतीशिवाय केल्या जाणाऱ्या अन्यायकारक आणि सक्तीच्या 'डिजिटल स्मार्ट मीटर' बसवण्याच्या मोहिमेविरोधात इंदापूर शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या हुकूमशाही कारभाराचा निषेध करण्यासाठी आणि नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी 'इंदापूर शहर नागरी संघर्ष समिती'च्या वतीने शनिवार, दिनांक ४ जुलै २०२६ रोजी संपूर्ण 'इंदापूर बंद'चे आवाहन करण्यात आले आहे. या बंदला व्यापारी आणि नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पाठिंबा द्यावा, असे आवाहन समितीने केले आहे.
महावितरणचा मनमानी कारभार आणि ग्राहकांची छळवणूक
मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण देशामध्ये आणि राज्यात सक्तीने स्मार्ट वीज मीटर बसवले जात आहेत. हे नवीन स्मार्ट मीटर बसवल्यापासून नागरिकांना नेहमीपेक्षा अनेक पटीने जास्त वीज बिल येत असल्याच्या तक्रारी आहेत. वाढीव आणि अवाच्या सव्वा बिलांमुळे सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक हैराण झाले असून त्यांना प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. इतकेच नव्हे तर, जुन्या वीज मीटरचे रीडिंगही चुकीचे दाखवून वीज ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
कायद्याचे उल्लंघन आणि महावितरणचे दुर्लक्ष
वीज कायदा २००३ नुसार, कोणत्याही ग्राहकाचा सुस्थितीत असलेला वीज मीटर त्याच्या पूर्वसंमतीशिवाय बदलता येत नाही, असा स्पष्ट नियम आहे. मात्र, महावितरण या कायद्याची उघडउघड पायमल्ली करत ग्राहकांना कोणतीही पूर्वकल्पना किंवा माहिती न देताच रात्रीत अथवा छुप्या पद्धतीने मीटर बदलत आहे. या संदर्भात वीज ग्राहकांनी महावितरणकडे अनेकवेळा लेखी व तोंडी तक्रारी केल्या, परंतु या तक्रारींची कोणतीही दखल घेतली गेली नाही. महावितरणच्या या उदासीन आणि अरेरावीच्या भूमिकेमुळे ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
'हित नागरिकांचे, काळजी इंदापूरकरांची' – भव्य यल्गार!
ग्राहकांचा आवाज दाबणाऱ्या महावितरणला जागा करण्यासाठी इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीने आता आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. "अन्यायकारक मीटर नको!", "सक्तीचा मीटर बंद करा!" आणि "ग्राहकांचे एकजूट झाल्याशिवाय पर्याय नाही" असा नारा देत समितीने शनिवारी (४ जुलै) इंदापुरात भव्य यल्गार पुकारला आहे.
संघर्ष समितीचे आवाहन:
"हा लढा कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून प्रत्येक इंदापूरकर वीज ग्राहकाच्या हक्काचा आहे. महावितरणच्या या अन्यायकारक सक्तीचा प्रतिकार करण्यासाठी शनिवार, ४ जुलै रोजी सर्व प्रतिष्ठाने, दुकाने बंद ठेवून या बंदमध्ये हजारोंच्या संख्येने सामील व्हावे. 'अभी नाही तो कभी नहीं' या भावनेने सर्व वीज ग्राहकांनी एकत्र येऊन आपल्या हक्कासाठी लढावे," असे आवाहन इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
