भडगाव: निसर्गाची किमया अगाध आहे, याचाच प्रत्यय आणून देणारी एक थक्क करणारी घटना समोर आली आहे. भडगाव तालुक्यातील वाडे येथील एका प्रगतीशील शेतकऱ्याच्या शेतात केळीच्या एकाच झाडाला चक्क २१४ केळफूले लागल्याचे पाहायला मिळत आहे. सामान्यतः केळीच्या एका झाडाला एक किंवा फार फार तर दोन-तीन केळफूले लागल्याचे आजवर ऐकण्यात किंवा पाहण्यात आलेले आहे. मात्र, वाडे येथील हा प्रकार सध्या संपूर्ण परिसरासाठी एक मोठा कुतूहलाचा विषय बनला आहे.
१ एकरात घेतली आहे केळीची लागवड
मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील वाडे येथील प्रगतीशील शेतकरी शांताराम भगवान गोठवाळ यांनी आपल्या १ एकर क्षेत्रात केळीच्या पिकाची लागवड केली आहे. अत्यंत मेहनत आणि कष्टाने त्यांनी ही केळीची या बागेतील एका विशिष्ट झाडाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
चक्क २१४ केळफुलांसह २४ घडांच्या फण्या
निसर्गाचा हा चमत्कार पाहण्यासाठी सध्या शांताराम गोठवाळ यांच्या शेतात लोकांची गर्दी होत आहे. या केळीच्या बागेतील एका झाडाला एकाच वेळी चक्क २१४ केळफूले लागलेली दिसत आहेत. एवढेच नव्हे तर, या झाडाला तब्बल २४ केळीच्या घडांसह फण्या लागलेल्या आहेत. केळीचा हा मुख्य घड प्रचंड मोठा आणि केळफुलांनी गच्च भरलेला दिसून येत आहे.
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समधील नोंद
केळीच्या उत्पादनात जागतिक पातळीवर विविध विक्रमांची नोंद केली जाते. 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स'नुसार (Guinness World Records) जगातील सर्वात मोठ्या केळीच्या घडामध्ये तब्बल ४७३ केळी लागल्याची आणि त्याचे वजन सुमारे १३० किलो (२८७ पाउंड) भरल्याची अधिकृत नोंद आहे. सामान्यत: एका झाडाला एकच मुख्य केळफूल आणि एकच घड येतो. मात्र, शांताराम गोठवाळ यांच्या झाडाला आलेली २१४ केळफूले आणि २४ घडांच्या फण्या हा जागतिक विक्रमांच्या पार्श्वभूमीवरही एक अत्यंत दुर्मिळ आणि थक्क करणारा निसर्गाचा चमत्कार मानला जात आहे.
शेतकरी आणि नागरिकांची पाहण्यासाठी गर्दी
एरवी एका झाडाला एवढ्या मोठ्या संख्येने केळफूले आणि फण्या लागणे अशक्यप्राय गोष्ट मानली जाते. त्यामुळेच ही अनोखी केळी पाहण्यासाठी वाडे परिसरासह आजूबाजूच्या गावांतील शेतकरी आणि नागरिक दररोज मोठ्या संख्येने शांताराम गोठवाळ यांच्या शेतात भेट देत आहेत, अशी माहिती स्वतः शेतकरी बांधवांकडून मिळाली आहे.
