इंदापूर, डॉ. संदेश शहा
दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशन लिमिटेड, पुणे यांच्या १०७ व्या वर्धापन दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थी व ज्येष्ठ मुद्रकांचा गौरव सोहळा टिळक रोड, स्वारगेट येथील डॉ. नीतू मांडके सभागृहात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला मुद्रण व्यवसायातील सभासदांसह त्यांच्या कुटुंबीयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध बिझनेस कोच चकोर गांधी उपस्थित होते. त्यांनी मुद्रण व्यवसायातील बदलती आव्हाने, संघटनशक्ती, व्यवसायवृद्धी आणि आधुनिक काळातील यशस्वी वाटचालीसाठी आवश्यक बाबींवर मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांना उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी मुद्रण कला जीवनगौरव पुरस्कार दीपक ढोले-पाटील यांना प्रदान करण्यात आला तसेच ज्येष्ठ सभासद रमेश कुंदुर, भाऊसाहेब सहस्त्रबुद्धे आणि मुकुंद कडूसकर यांचा अमृतमहोत्सवा निमित्त विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात दहावी, बारावी, डिप्लोमा आणि पदवी परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कोथरूड येथील वर्धमान प्रेसचे संचालक प्रीतम पोपटलाल मेहता यांचे चिरंजीव हर्ष प्रीतम मेहता यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
सोहळ्यानिमित्त आयोजित "सुरमई शाम" या मनोरंजनपर गीतांच्या कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष राहुल मारुलकर, उपाध्यक्ष किशोर गोरे, चिटणीस गिरीश राव तसेच दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशन लिमिटेडच्या सर्व कार्यकारी संचालक मंडळाने विशेष परिश्रम घेतले.
