इंदापूर, डॉ. संदेश शहा
शेकडो वर्षाची परंपरा असलेला मोहरम शहरात साजरा करण्यात येत आहे. मोहरम या सणामध्ये शिवकाळामधे जे मैदानी खेळ खेळले जात होते, त्या खेळाची याला पार्श्वभुमी आहे. मोहरममधील दहा दिवस महत्वाचे समजले जातात. यातील ६, ७, ८ या दिवशी शहरातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या मोहल्ल्यातून विविध प्रकारच्या म्हणजे मल्लखांब, दांडपट्टा, तलवारबाजी, विविध प्राण्यांच्या चित्रांची प्रतिकृती असलेल्या गाड्यांची मिरवणूक निघत असे.
मोहरमच्या नवव्या दिवसाला कत्तलची रात असे म्हणतात. या दिवसाला मोहरम मधे विशेष महत्व आहे या दिवशी हसेन हुसेन यांचे विषयी आदर भावना म्हणून लाल, पिवळ्या रंगाचा नाडा हातात बांधण्याची प्रथा आजही भाविक पाळताना दिसतात. मोहरममधे नवसाचे वाघ होण्याची परंपरा आहे परंतु आता ही प्रथा लोप पावत चालल्याचे दिसते. मोहरम या सणास इंदापूर शहराची वैभवशाली गौरवाची परंपरा आहे.
इंदापूरचा मोहरम पुणे, सोलापूर, सातारा, नगर आसपासच्या जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. हिंदू - मुस्लीम एकत्र येऊन मोहरम मधे सहभागी होऊन साजरा करत आलेले आहेत म्हणून मोहरमला आगळे वेगळे महत्व आहे. यामुळे हिंदू मुस्लीम ऐक्याची भावना दृढ होत आली असून ही परंपरा आजही टिकून आहे. शहरात शेख मोहल्ला, कसबा, सातपुडा, बागवान गल्ली, कुरेशी मोहल्ला, ठाकर गल्ली या ठिकाणी मानाचे पंजे व ताबूत बसवले जातात. यामधे शेख मोहल्ला व कसबा या ठिकाणाला विशेष असे महत्व आहे. शेख मोहल्ल्यातील ताबूत म्हणजे थोरला भाऊ व कसबा म्हणजे धाकटा भाऊ. यांची मोहरमच्या १० तारखेला ज्या वेळी आपल्या जागेवरून निघतात नंतर त्यांची डावी उजवी नेहरू चौक येथे होते. तेव्हा हा अविस्मरणीय गळाभेटीचा हा प्रसंग आपल्या डोळ्यात 'टिपण्यासाठी हजारो लोकांचा समुदाय उपस्थित असतो. भेटी वेळी हायदोस्त - दुल्हा याचा एकच जयघोष केला जातो.
