प्रतिनिधी - श्री. अक्षय सुपुते
शेळगाव : इंदापूर तालुक्यातील शेळगाव ते व्याहाळी रस्त्याची (जिल्हा मार्ग क्रमांक ७६) दुरवस्था झाली असून, या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिक, शेतकरी आणि शालेय विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकरी आणि ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.
हा रस्ता लोणी देवकर एमआयडीसीला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावरून दररोज मोठ्या संख्येने वाहनांची ये-जा सुरू असते. मात्र गेल्या काही वर्षांपासून रस्त्याची दुरुस्ती न झाल्यामुळे जागोजागी खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे, त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागते.
या खड्डेमय रस्त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमालाची वाहतूक करताना अनेक अडचणी येत आहेत. तसेच, या रस्त्याचा वापर करणारे शालेय विद्यार्थीही जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. अपघाताची भीती वाढल्याने स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत.
या गंभीर परिस्थितीमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. जर याकडे दुर्लक्ष झाले, तर आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे लक्ष देऊन, हा महत्त्वाचा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
