इंदापूर:
इंदापूर येथील शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आणि अक्षरभारती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आगामी १० आणि ११ जानेवारी २०२६ रोजी दुसऱ्या मराठी बालसाहित्य संमेलनाचे भव्य आयोजन इंदापूर येथे करण्यात आले आहे. इंदापूरच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या या संमेलनासाठी आतापासूनच जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.
या संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त नामवंत बालसाहित्यिक आबा महाजन असणार आहेत. महाजन यांनी आपल्या लेखनातून बालविश्व अत्यंत प्रभावीपणे मांडले असून, त्यांच्या निवडीमुळे बालसाहित्य वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे. तसेच, संमेलनाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या हस्ते होणार आहे. सासणे यांच्यासारख्या अनुभवी साहित्यिकाची उपस्थिती लाभल्याने या सोहळ्याला विशेष वैचारिक अधिष्ठान प्राप्त होणार आहे.
संमेलनाचे स्वरूप अत्यंत भरगच्च आणि वैविध्यपूर्ण असणार आहे. दोन दिवसांच्या या कालावधीत मुलांचे कविसंमेलन, कथाकथन आणि नाट्यसादरीकरण, विविध कार्यक्रमांची रेलचेल असेल. तसेच मोबाईल व्यसनमुक्ती या ज्वलंत विषयावर विशेष मार्गदर्शन होणार आहे. या उपक्रमांचा मुख्य उद्देश मुलांमधील सुप्त कलागुणांना वाव देणे हा आहे. संमेलनामध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण ट्रस्टच्या अध्यक्षा मा. पद्माताई भोसले आणि सचिव डॉ. गिरीश देसाई सर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. स्वागताध्यक्ष म्हणून श्री. तुषार रंजनकर संपूर्ण नियोजनाची धुरा सांभाळणार आहेत. तसेच विश्वस्त श्री. अरविंद गारटकर सर यांच्या संकल्पनेमधून विविध स्पर्धा राबविण्यात येणार आहेत. शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आणि अक्षरभारती यांच्या या संयुक्त पुढाकारामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हे बालसाहित्य संमेलन एक मोठी पर्वणीच ठरणार आहे. अशा संमेलनांमुळे मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होऊन त्यांची शब्दसंपत्ती वाढण्यास मदत होते. थोर साहित्यिकांचे विचार ऐकल्यामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला नवी दिशा मिळते आणि त्यांच्यात सृजनशीलता विकसित होते. केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न राहता, साहित्याच्या विशाल विश्वाशी मुलांची ओळख व्हावी आणि त्यांच्यामध्ये वैचारिक प्रगल्भता यावी, हा या संमेलनाचा सर्वात मोठा फायदा ठरणार आहे. यासोबतच बालसाहित्य क्षेत्रातील विविध पुस्तके विद्यार्थ्यांना पहावयास मिळणार आहेत. मोबाईलच्या युगात मुलांना पुन्हा एकदा पुस्तकांशी जोडण्याचा हा एक स्तुत्य प्रयत्न आहे.
आबा महाजन यांनी बालमनावर संस्कार करणारे साहित्य निर्माण केले आहे, तर भारत सासणे यांनी मराठी साहित्यात आपली वेगळी मुद्रा उमटवली आहे. या दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूरमध्ये भरणारे हे दुसरे मराठी बालसाहित्य संमेलन विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. इंदापूर आणि परिसरातील सर्व शाळांनी आणि पालकांनी या साहित्याच्या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आणि अक्षरभारतीच्या वतीने करण्यात आले आहे.

