इंदापूर: शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 'कर्मयोगी'च्या कार्यक्षेत्रातील माळवाडी नंबर १ येथील ऊसतोड मजुरांसाठी विशेष मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सोमवार, ५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता पार पडलेल्या या शिबिरात परिसरातील १०३ मजुरांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना आवश्यक औषधोपचार पुरवण्यात आले.
कार्यक्रमाचे औचित्य साधून शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे खजिनदार मा. श्री. तुषार रंजनकर सर आणि ट्रस्टचे इन्चार्ज श्री. दिपक जगताप यांनी ऊसतोड मजुरांच्या मुलांची भेट घेतली. कष्टाच्या कामात मजुरांच्या मुलांचे आरोग्य आणि आनंद जपण्यासाठी या दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या हस्ते लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. अचानक मिळालेल्या या भेटीमुळे आणि खाऊमुळे मुलांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पाहायला मिळाला.
आरोग्य तपासणी सुरू असताना तुषार रंजनकर सर व दीपक जगताप सर यांनी स्वतः रांगेत उभे असलेल्या ऊसतोड मजुरांशी संवाद साधला. "ट्रस्टद्वारे राबवण्यात येणारी आरोग्य सेवा तुम्हास कशी वाटते?" आणि "मिळणाऱ्या औषधांचा तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होत आहे?" असे प्रश्न विचारून त्यांनी मजुरांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी मजुरांनीही प्रशासनाचे आभार मानत अशा शिबिरांमुळे आमचा दवाखान्याचा खर्च वाचत असल्याची भावना व्यक्त केली.
या शिबिराच्या यशस्वी नियोजनासाठी शिरसोडी 'अ' विभागाचे प्रमुख ए. के. भोंगळे, शिरसोडी 'ब' विभागाचे प्रमुख आर. के. नलवडे, कर्मयोगीचे कर्मचारी अनिल व्यवहारे आणि भारत गडदे यांनी विशेष परिश्रम घेतले. या विभागातील सर्व ऊसतोड मजुरांना वेळेत तपासणीसाठी आणणे आणि शिबिरातील शिस्त राखण्यासाठी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.
वैद्यकीय तपासणीचे मुख्य काम केंद्राच्या प्रमुख डॉ. सारंगी कुंभार, केंद्र प्रमुख महादेव चव्हाण, हनुमंत गोफणे आणि त्यांच्या सहकारी नर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांनी पार पाडले. मजुरांच्या आरोग्याचे निदान करून त्यांना पुढील सल्ले देण्यात आले. या सामाजिक उपक्रमाचे संपूर्ण इंदापूर तालुक्यात आणि कर्मयोगी साखर कारखाना परिसरात कौतुक होत आहे.

