बिजवडी: भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आज, २६ जानेवारी २०२६ रोजी, शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित 'कोपिवरची शाळा' अभ्यासवर्गातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सण मोठ्या उत्साहात साजरा केला. कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना, बिजवडी येथील ऊसतोड मजुरांच्या वसाहतीत वास्तव्यास असलेल्या मुलांसाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव डॉ. गिरीश देसाई, खजिनदार श्री. तुषार रंजनकर व विश्वस्त श्री. अरविंद गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात उत्साही वातावरणात झाली. वसाहतीतील सर्व विद्यार्थ्यांना ध्वजारोहणाच्या मुख्य कार्यक्रमासाठी जवळच्या प्राथमिक शाळेत नेण्यात आले. यावेळी मुलांनी प्रभातफेरी काढून परिसर घोषणांनी दणाणून सोडला होता. या आनंदोत्सवाचे औचित्य साधून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नवीन कपडे आणि खाऊचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला.
याप्रसंगी आरोग्य केंद्र प्रमुख श्री. महादेव चव्हाण, कोपिवरची शाळा प्रमुख श्री. भारत बोराटे, सामाजिक कार्यकर्ते श्री. हमीदभाई अत्तार, प्रकल्प अधिकारी श्री. सागर कांबळे, तसेच केदार गोसावी, श्रुती सपळे आणि श्री. गोफणे तसेच इतर नागरिक उपस्थित होते. ऊसतोड मजुरांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात ठेवण्यासाठी आणि त्यांच्यात राष्ट्रभक्तीची भावना रुजवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

