इंदापूर प्रतिनिधी: शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेच्या वतीने आयोजित दुसऱ्या विशेष मेकअप बॅचचा उद्घाटन समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव डॉ. गिरीश देसाई, विश्वस्त श्री. अरविंद गारटकर आणि खजिनदार श्री. तुषार रंजनकर यांच्या मार्गदर्शनाखाली या व्यावसायिक प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
संस्थेच्या वतीने नुकतीच मेकअप प्रशिक्षणाची पहिली बॅच यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. या पहिल्या बॅचला विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आणि मागणीचा विचार करून लगेचच या दुसऱ्या विशेष बॅचचे आयोजन करण्यात आले आहे. या उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विद्या प्रतिष्ठानचे प्राचार्य डॉ. सुयश देशपांडे, मेकॅनिकल डिपार्टमेंटचे विभाग प्रमुख प्रा. सचिन पवार याचे मार्गदर्शन लाभले. तसेच संस्थेचे खजिनदार श्री. तुषार रंजनकर, विश्वस्त श्री. अरविंद गारटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. सुयश देशपांडे यांनी आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पारंपरिक शिक्षणावर अवलंबून न राहता 'कौशल्य शिकण्याचे आणि अंगिकारण्याचे महत्त्व' सविस्तरपणे विशद केले. तर, खजिनदार श्री. तुषार रंजनकर यांनी आपल्या मनोगतातून संस्थेकडून सातत्याने राबविल्या जाणाऱ्या विद्यार्थी हिताच्या कार्याची आणि भविष्यातील योजनांची माहिती उपस्थितांना दिली.
या उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन श्रद्धा पवार यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विश्वस्त अरविंद गारटकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रशिक्षक शीतल गुळवे, संस्थेचे इन्चार्ज दिपक जगताप, सागर कांबळे, अमोल राऊत, त्रिशला पाटील, केदार गोसावी आणि स्वाती कोल्हे उपस्थित होते. तसेच संग्राम यादव, कुमार गवळी, ओम गवळी, स्वरीत शेलार, आयन खान, सुरज जाधव, आश्लेषा बेंद्रे, आम्रपाली राउत यांनी परिश्रम घेतले. या नवीन बॅचमुळे परिसरातील तरुणांना रोजगारभिमुख कौशल्य मिळण्यास मोठी मदत होणार आहे.

