इंदापूर, डॉ. संदेश शहा
जीवनात यशस्वी होण्यासाठी शिस्त, एकाग्रता आणि वक्तशीरपणा या यशाच्या तीन गुरु किल्ल्या आहेत. निरंतर प्रयत्न आणि सकारात्मक दृष्टिकोनातून प्रत्येक विद्यार्थी आपली स्वप्ने निश्चितच पूर्ण करून आपले आयुष्य घडवू शकतो असे प्रतिपादन शहा ग्लोबल स्कूलचे व्यवस्थापन सदस्य अंगद शहा यांनी केले.
शहा ग्लोबल स्कूल, इंदापूर येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांसाठी ‘ड्रीम ट्री म्हणजेच स्वप्नवृक्ष हा प्रेरणादायी उपक्रम संपन्न झाला. शाळेचे व्यवस्थापन सदस्य अंगद शहा व रुचिरा शहा यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी अंगद शहा पुढे म्हणाले, या अभिनव उपक्रमामध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि व्यवस्थापन सदस्यांनी नव्या शैक्षणिक वर्षातील आपली स्वप्ने, ध्येय आणि संकल्प स्टिकी नोटवर लिहून स्वप्नवृक्षावर प्रदर्शित केले. विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची प्रेरणा देणे हा उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी रुचिरा शहा यांनी विद्यार्थी व शिक्षकांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत यशस्वी आणि आनंददायी वर्षासाठी प्रेरित केले.
शाळेच्या प्राचार्या वैष्णवी देशपांडे म्हणाल्या, “स्वप्ने ही यशाची पहिली पायरी आहे. स्पष्ट ध्येय निश्चित करून त्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारा विद्यार्थीच यशस्वी ठरतो. विद्यार्थ्यांचे मन, मेंदू व मनगट बळकट करण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे. यावेळी सकाळच्या प्रार्थना सभेची सुरुवात प्रार्थना, प्रतिज्ञा आणि राष्ट्रगीताने झाली. विद्यार्थ्यांनी आजचा सुविचार, आजचा शब्द आणि महत्त्वाच्या बातम्यांची शीर्षके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अमृता चव्हाण यांनी केले. विद्यार्थ्यांच्या स्वप्नांनी सजलेल्या ‘ड्रीम ट्री’मुळे संपूर्ण शाळा परिसर आकर्षक व प्रेरणादायी वातावरणाने भारावून गेला होता. उपक्रम यशस्वीतेसाठी शाळे तील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सहाय्यक कर्मचाऱ्यांनी अनमोल योगदान दिले. नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात सकारात्मक ऊर्जा, आत्मविश्वास आणि उत्साहपूर्ण वातावरणात झाल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

