महाबळेश्वर: महाबळेश्वर बस स्थानकावर बस सुटण्यास होत असलेल्या विलंबाबाबत विचारणा करणाऱ्या पत्रकारांशी अत्यंत अरेरावीची भाषा वापरत अपशब्द बोलणाऱ्या एसटी वाहतूक निरीक्षक शाहरुख खान यांच्यावर अखेर निलंबनाची गाज पडली आहे. सातारा विभाग नियंत्रकांनी या मुजोर कर्मचाऱ्याच्या वर्तनाची गंभीर दखल घेत त्याला तातडीने सेवेतून निलंबित केले आहे.
पहा व्हिडीओ
घटनेचा सविस्तर तपशील
महाबळेश्वर बस स्थानकातून सुटणाऱ्या बसला उशीर होत असल्याने प्रवासी ताटकळत उभे होते. यावेळी कर्तव्यावर असलेले एसटीचे वाहतूक निरीक्षक शाहरुख खान यांच्याकडे उपस्थित पत्रकारांनी "बस सुटण्यास उशीर का होत आहे? आणि बस कधी सुटेल?" अशी विचारणा केली.
या साध्या प्रश्नावर उत्तर देण्याऐवजी वाहतूक निरीक्षक खान यांचा पारा चढला. त्यांनी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांशी अत्यंत उद्धट आणि अरेरावीची भाषा वापरली. एवढ्यावरच न थांबता, त्यांनी संपूर्ण पत्रकार जगताबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन भाष्य केले आणि वाईट अपशब्दांचा वापर केला. या मुजोर वर्तनामुळे बस स्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
विभाग नियंत्रकांकडून त्वरित कारवाई
या घटनेची माहिती मिळताच सातारा विभाग नियंत्रकांनी तातडीने पावले उचलली. शासकीय पदावर असताना पत्रकार आणि नागरिकांशी अशा प्रकारे गैरवर्तन करणे एसटी महामंडळाच्या शिस्तीत बसत नसल्याने, विभाग नियंत्रकांनी मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खान याला त्वरित प्रभावाने सेवेतून निलंबित केले आहे.
कर्मचाऱ्यांना सौजन्याने वागण्याचे कडक निर्देश
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, सातारा विभाग नियंत्रकांनी विभागातील सर्वच एसटी कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत. सर्व प्रवाशांशी आणि पत्रकारांशी संवाद साधताना नेहमी नम्रता आणि सौजन्याची भाषा वापरली पाहिजे. ड्युटीवर असताना प्रवाशांच्या प्रश्नांना शांतपणे उत्तरे द्यावीत; कोणत्याही प्रकारची उद्धटपणाची भाषा खपवून घेतली जाणार नाही. भविष्यात अशा प्रकारचा शिस्तभंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर थेट कडक कारवाई केली जाईल. विभाग नियंत्रकांच्या या तातडीच्या आणि कठोर निर्णयामुळे पत्रकार संघटनांसह सर्वसामान्य प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.
