इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर शहरातील जुन्या पुणे-सोलापूर हायवेवरील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असून, ती सुटण्याचे नाव घेत नाही आहे. रस्त्यावरील बेशिस्त पार्किंग, फुटपाथवरील अतिक्रमणे आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसह स्थानिक नागरिकांना रोज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
बेशिस्त पार्किंगमुळे हायवेची एक लेन होतेय बंद
महामार्गाच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात अनधिकृत दुचाकी आणि चारचाकी वाहने पार्क केली जात आहेत. या बेशिस्त पार्किंगमुळे रस्त्याची एक संपूर्ण लेन नेहमी बंदच राहते. मुख्य रस्त्याचा आकार लहान झाल्यामुळे येथून वाहने चालवताना चालकांची मोठी कसरत होते आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात.
एस.टी. बस चालवताना अडचणी; रुग्णावाहिकाही अडकतात कोंडीत
इंदापूर बस स्थानकातून बाहेर पडणाऱ्या एस.टी. बसेसना वळण घेताना या कोंडीमुळे प्रचंड अडचणी येत आहेत. बस वळवताना बराच वेळ जात असल्याने मुख्य रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. या सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीचा सर्वात मोठा फटका आपत्कालीन सेवांना बसत आहे. 'इमर्जन्सी' असलेल्या रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकाही या कोंडीत अडकत असल्याने रुग्णांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
फुटपाथ गायब; नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागते
रस्त्याच्या कडेला असलेल्या फुटपाथवर चहाच्या टपऱ्या, नाश्त्याच्या गाड्या आणि फळांचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. फुटपाथवर असलेल्या या दुकानांमुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागाच उरलेली नाही. परिणामी, नागरिकांना, महिलांना आणि शाळकरी मुलांना मुख्य रस्त्यावरूनच पायी चालावे लागत आहे. यामुळे अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
प्रशासनाकडून ठोस कारवाईची मागणी
रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून आणि बेशिस्त पार्किंग करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करून ही वाहतूक कोंडी तातडीने सोडवावी, अशी मागणी आता इंदापूरच्या नागरिकांमधून आणि प्रवाशांमधून जोर धरू लागली आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

