इंदापूर प्रतिनिधी : इंदापूर येथील विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांच्या हस्ते अल्फा बाईट कॉम्प्युटर्सचे प्राचार्य श्री. तुषार रंजनकर सर यांचा त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल 'अल्फा बाईट हॉल'मध्ये विशेष सन्मान करण्यात आला. श्री. तुषार रंजनकर सर यांनी गेल्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत तब्बल ४० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना संगणक क्षेत्रामध्ये प्रशिक्षित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक विद्यार्थी आज देश-विदेशातील विविध क्षेत्रांमध्ये उच्च पदांवर यशस्वीपणे कार्यरत आहेत. तंत्रज्ञान क्षेत्रातील या अतुलनीय योगदानासोबतच ते सामाजिक कार्यातही अग्रेसर आहेत. सध्या ते पुण्यातील नामांकित 'विद्यार्थी साहाय्यक समिती'चे कार्यकारी विश्वस्त म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. ही संस्था ग्रामीण भागातून उच्च शिक्षणासाठी पुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांची राहण्याची आणि भोजनाची उत्तम सोय करते.
या व्यतिरिक्त, श्री. तुषार रंजनकर सर हे 'शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट' या संस्थेच्या खजिनदार पदावरही कार्यरत आहेत. या संस्थेच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विविध कौशल्य विकास आणि प्रशिक्षण उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहेत. या सत्कार समारंभाप्रसंगी शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त श्री. अरविंद गारटकर, विद्या प्रतिष्ठानचे प्राध्यापक डॉ. प्रीतम ठाकूर आणि प्रा. संतोष देवकाते प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वांनी श्री. तुषार रंजनकर सर यांच्या कार्याचे भरभरून कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना श्री. अरविंद गारटकर यांनी आवर्जून नमूद केले की, श्री. तुषार रंजनकर सर हे 'कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन' या तत्वानुसार कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता अत्यंत निस्वार्थपणे आपले कार्य करत आहेत.

