इंदापूर पुणे : डॉ. संदेश शहा
नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे भारतातील आघाडीचे ‘फ्युचर ऑफ लर्निंग’ असून हे विद्यापीठ विविध शिक्षणक्रम आणि शैक्षणिक आदान प्रदान व्यवहार यामध्ये डिजीटल तंत्रज्ञानाचा मोठ्या कौशल्याने वापर करत आहे. त्यामुळे हे विद्यापीठ लोक विद्यापीठाचा दर्जा कायम राखतानाच शैक्षणिक विश्वात ‘ग्लोबल मॉडेल’ बनण्याकडे वाटचाल करत आहे, असे गौरवोद्गार भारत सरकारचे गृह व न्याय विभागाचे माजी अतिरिक्त मुख्य सचिव तथा राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषद एनसीव्हीईटी चे माजी अध्यक्ष डॉ. निर्मलजित सिंह कलसी ( सेवानिवृत्त आय.ए.एस.) यांनी काढले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा ३१ वा दीक्षान्त सोहळा विद्यापीठ आवारात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून दीक्षान्त भाषण करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे होते. व्यासपीठावर डॉ. बाळासाहेब कृषी विद्यापीठ, दापोलीचे कुलगुरू डॉ. संजय भावे, मुक्त विद्यापीठाचे प्र - कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, विद्यापीठ व्यवस्थापन मंडळ सदस्य प्रा. डॉ. संजीवनी महाले, डॉ. अक्षया निकुंभ, डॉ. अनिल गावित, डॉ. प्रसेनजीत फडणवीस, डॉ. दत्तात्रय गुजराथी, प्रा. वाल्मिक सरवदे, डॉ. संजय भावे, नरेंद्र जोशी, प्रा. एन. के. दास, कुलसचिव तथा वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील व विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांचे संचालक आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. निर्मलजित सिंह कलसी पुढे म्हणाले, एकाचवेळी १ लाख २३ हजार ९२१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान होणे हे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व्यापकतेचे, समावेशकतेचे व शैक्षणिक बांधिलकीचे द्योतक आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी या विद्यापिठाशी संलग्न असतात. वैविध्यपूर्ण शिक्षणक्रम, दर्जेदार पाठ्यपुस्तके, परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करणे, गुणपत्रिका व प्रमाणपत्रासाठी अत्याधुनिक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर अशी विद्यापीठाची प्रगती थक्क करणारी आहे. राज्य व राज्याबाहेरील अनेकजण विद्यापीठ तंत्रज्ञानाधारित उपक्रम आणि प्रणालीची माहिती घेत अवलंब करत आहेत. हे विद्यापीठाचे व्यापक यश आहे. त्यासाठी विद्यापीठ नेतृत्व व विद्यापीठ परिवार कौतुकास पात्र आहे. जगभरात उच्च शिक्षणाची व्याख्या बदलत असून त्यात मुक्त विद्यापीठांचे महत्व वाढत आहे. मुक्त विद्यापीठे ही आता दुय्यम पर्याय राहिली नसून सर्वसमावेशक आणि राष्ट्रीय क्षमता वृद्धीची अग्रणी केंद्रे बनली असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. देश विदेशातील बदलती परिश्तिती लक्षात घेता स्थैर्याची कोणतीही हमी नसणे, क्षमतेमुळे संधीची दारे उघडणे आणि मूल्यांचे महत्व वाढत जाणार ही तीन ठळक वास्तव त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्याच बरोबर आयुष्यभर नवनवीन गोष्टी शिकत राहणे, कुठल्याही एका गोष्टीत प्राविण्य मिळविणे, तंत्रज्ञानाला आपला स्नेही बनवणे, स्वत:विषयी इतरांमध्ये विश्वास निर्माण करणे, इतरांशी तुलना न करता आपले प्रामाणिक योगदान, नितीमुल्यांशी तडजोड न करणे व सदैव सेवाव्रती राहणे ही यशाची सप्तसूत्री असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. विद्यापीठाने आगामी काळात उद्योगाशी सुसंगत असे अल्पकालीन शिक्षणक्रम पूर्वीपेक्षा मोठ्या प्रमाणात विकसित करावेत, विद्यार्थ्यांना एआय तंत्रज्ञान आधारित वैयक्तिक शिकवणी साहाय्य करावे महाराष्ट्र राज्याच्या प्राधान्य क्षेत्रासाठी संशोधन व उपाय सुचवावेत अशी अपेक्षा डॉ. कलसी भाषणाच्या शेवटी व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे म्हणाले, जगात कौशल्याधारीत मनुष्यबळाची मागणी वाढली आहे. त्यानुसार काळाची कास पकडत विद्यापीठाने तीन महिने कालावधीपासून वर्षभर मुदतीचे विविध नवीन अभ्यासक्रम सुरु केले आहेत. ऑनलाईन शिक्षणक्रमांची संख्या शंभरच्यावर नेण्याचे विद्यापीठाचे नियोजन आहे. विकसित महाराष्ट्र २०४७ अंतर्गत विद्यापीठाने स्वत:चा संस्थात्मक विकास आणि दृष्टीकोन आराखडा सन २०२५ ते २०३५ तयार केला आहे. विद्यापीठ स्थापने पासून एकूण ४५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा लाभ घेतला आहे. त्यात चार लाख विद्यार्थ्यांचा कृषी शिक्षणक्रमात समावेश आहे. विद्यापीठाची २८०० हून अधिक शैक्षणिक प्रकाशने व दोन हजार पेक्षा अधिक दृक श्राव्य अध्ययन संसाधने अनमोल आहेत. डिजिटल ओळखपत्र असलेले ‘यशकार्ड’ हे विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरत आहे. वाढवन बंदर प्रकल्पा साठी विद्यापीठाचा सन २०३० पर्यंत तीन लाख कुशल मनुष्यबळ प्रशिक्षणाचा मानस आहे. विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी सुरु केलेला कृत्रिम बुद्धीमत्ता आधारित प्रशिक्षण कार्यक्रम व महाज्ञानदीप प्रकल्पविषयी देखील त्यांनी यावेळी माहिती दिली. देश समृद्ध करण्याच्या दृष्टीने आपल्या परीने सर्वांनी सर्वोत्तम योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी शेवटी केले.
तत्पूर्वी प्रमुख अतिथी व मान्यवर यांच्या हस्ते माशालकर अष्टमी शिवानंद ( बी.ए. ), बेतागर विनोद प्रकाश ( बी. लिब.), येरणे हरीश विस्तारी ( जनसंज्ञापण व पत्रकारिता ), भूतडा साईनाथ श्रीराम ( एम. बी. ए.), राऊत काजल रामचंद्र ( एम. कॉम ), शेलार शीतल सुभाष ( बी. कॉम ), कोल्हे आरती पांडुरंग ( एम. ए. शिक्षणशास्त्र ), कस्तुरे प्रतिमा रामकृष्णा ( बी.ए. शिक्षणशास्त्र ), सिल्व्हेरीया व्हीन्सेंट मायकल ( बी.सी.ए.), शुमैला जबीन हमजा खान ( एम. एस्सी. भौतिकशास्त्र), पवार स्मिता प्रताप ( एम. एस्सी. गणित) या अकरा विद्यार्थ्यांना विद्यापीठाचे सुवर्णपदक देवून गौरवण्यात आले. तसेच माशालकर अष्टमी शिवानंद या विद्यार्थिनीस प्रातिनिधिक स्वरूपात ब्लॉकचेन तंत्रज्ञान वर आधारित क्युआर कोड असलेल्या पदवीची डिजिटल प्रत डॉ. कलसी यांच्या शुभहस्ते हस्तांतरित करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शुभांगी पाटील व दत्ता पाटील यांनी केले.
या दीक्षान्त समारंभां साठी पीएच. डी., पदव्युत्तर पदवी, पदवी व पदविका अशा विविध प्रकारच्या १०१ शिक्षणक्रमांतील एक लाख २३ हजार ९२१ विद्यार्थ्यांना यंदा पदवी प्रदान केली गेली. त्याचे वैशिष्ट्ये म्हणजे पदवी धारकात ६० वर्ष वया वरील २०८ विद्यार्थी, ७७ दृष्टीबाधित विद्यार्थी, विविध कारागृहात शिक्षा भोगत असलेले ६८ बंदीजन यांचा समावेश होता. १ लाख २३ हजार ९२१ पैकी पदविकाधारक १२ हजार ६३७, पदवी धारक ९० हजार ७०८, पदव्युत्तर पदवीधारक २० हजार ५७१, पीएच. डी. धारक ५ विद्यार्थी, ७१ हजार ७९१ पुरुष व ५२ हजार १३० स्त्री विद्यार्थी यांचा समावेश होता. तत्पूर्वी सकाळी विद्यापीठ प्रांगणातील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास प्रमुख अतिथी डॉ. कलसी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार - फुले अर्पण करून मानवंदना देण्यात आली. परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील यांनी ज्ञानदंडासह विद्वत मिरवणुकीचे नेतृत्व केले. प्रमुख मान्यवर यांच्या व्यतिरिक्त मंचावर विदयशाखांचे संचालक नागार्जून वाडेकर, डॉ. सुरेंद्र पाटोळे, डॉ. माधुरी सोनवणे, डॉ. चेतना कमळस्कर, प्रा. डॉ. जयदीप निकम, डॉ. नितीन ठोके, डॉ. रश्मी रानडे, प्रा. गणेश लोखंडे, प्रा. कैलास मोरे उपस्थित होते. यावेळी विद्वत परिषदेचे सदस्य डॉ. संजय तांबट, प्रा. प्रकाश देशमुख, प्रा. सज्जन थुल, डॉ दयाराम पवार, डॉ. प्रकाश बर्वे, डॉ. लतिका गायकवाड, डॉ. मधुकर शेवाळे, प्रा. राजेंद्र वाघ, मधुकर गवळी, डॉ. राजेंद्र विखे पाटील, नियोजन मंडळ सदस्य डॉ. काकासाहेब मोहिते व डॉ. वाणी लातूरकर, गोविंद डंबाळे ( सरपंच गोवर्धन ग्रामपंचायत ), बाळासाहेब लांबे ( उपसरपंच गोवर्धन ग्रामपंचायत ), पी. के. जाधव ( माजी सरपंच गोवर्धन ग्रामपंचायत ), जनसंपर्क अधिकारी महेंद्र बनसोडे, विद्यापीठ विभागीय केंद्र संचालक हे देखील उपस्थित होते. राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत व विद्यापीठ गीताने सोहळ्याची सुरुवात तर राष्ट्रगीताने सांगता झाली.

