इंदापूर (प्रतिनिधी: गणेश धनवडे):
इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. प्रतिष्ठानचे सचिव विरसिंह भैय्या रणसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याची सुरुवात भव्य पदयात्रेने झाली. 'जय भवानी, जय शिवाजी' अशा घोषणांनी महाविद्यालय परिसर दणाणून गेला होता. या पदयात्रेच्या माध्यमातून शिवकाळातील शौर्य, राष्ट्रप्रेम आणि स्वराज्याविषयी जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणून व्याख्याते प्रा. रवी गायकवाड यांनी महाराजांच्या राजकीय आणि प्रशासकीय पैलूंवर प्रकाश टाकला. त्यांनी आपल्या व्याख्यानात शिवरायांची आरमार बांधणी, लष्करी प्रशासन, व्यापार नीती आणि गुप्तहेर खात्याचे महत्त्व विशद केले. महाराजांनी केवळ स्वराज्य स्थापन केले नाही, तर त्याचे 'सुराज्यात' कसे रूपांतर केले, याची सविस्तर मांडणी करत त्यांनी शिवरायांच्या पोलादी प्रशासनाची उकल केली.
या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रशांत शिंदे यांनी छत्रपती शिवरायांना 'निश्चयाचा महामेरू' संबोधून त्यांचे कार्य आजही दीपस्तंभासारखे प्रेरक असल्याचे सांगितले. प्रत्येक नागरिकाने महाराजांचा त्याग, शौर्य आणि पराक्रमाची आठवण मनात तेवत ठेवली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. अशोक काळंगे यांनी प्रतिपादन केले की, शिवरायांच्या विचारांचा ध्यास घराघरात पोहोचला तरच एका नैतिक समाजाची निर्मिती होईल.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य डॉ. अशोक काळंगे यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या सोहळ्यासाठी विज्ञान शाखाप्रमुख डॉ. सुहास बहिरट, वाणिज्य शाखाप्रमुख डॉ. विलास बुवा यांच्यासह सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजनेचे समिती सदस्य डॉ. अमर वाघमोडे, प्रा. महादेव माळवे, प्रा. सोमनाथ चव्हाण, प्रा. आकांक्षा मेटकरी आणि प्रा. नितीन रुपनवर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. राजेंद्रकुमार डांगे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. सुवर्णा बनसोडे यांनी प्रभावीपणे पार पाडले. शेवटी उपप्राचार्य डॉ. प्रशांत शिंदे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले आणि या प्रेरणादायी सोहळ्याची सांगता झाली.
