डॉ. स्नेहल महेशकर
मानसशास्त्रीय समुपदेशक
Neuro Parenting & Smart Studies Mentor
दुपारची शाळा सुटते. परीक्षा संपवून मुलं गेटबाहेर येतात. कुणाच्या चेहऱ्यावर हायसं वाटलेलं असतं, तर कुणाच्या मनात अजूनही प्रश्नपत्रिकेचे विचार घोंगावत असतात. अशा वेळी प्रेमाने, काळजीने सहज पालक विचारतात — “पेपर कसा झाला?” हेतू नक्कीच सकारात्मक; मात्र प्रत्येक वेळी हा प्रश्न मुलासाठी हलकासा नसतो. कारण पेपर देऊन बाहेर पडताना मुलाचा मेंदू आधीच थकलेला, ताणाच्या प्रभावाखाली असतो आणि त्या क्षणी त्याला सर्वात जास्त गरज असते ती विश्रांतीची व भावनिक सुरक्षिततेची. अशा नाजूक क्षणी विचारलेला साधा प्रश्नही कधी कधी दबाव किंवा आत्मसंशय निर्माण करू शकतो.
परीक्षा देताना मेंदू प्रचंड एकाग्रतेने काम करत असतो. स्मरणशक्ती, विचारशक्ती, निर्णयक्षमता — सर्वांवर ताण आलेला असतो. पेपर संपल्यावरही शरीर व मेंदू लगेच शांत होत नाहीत. ताण-हॉर्मोन्स काही काळ सक्रिय राहतात. त्यामुळे मुलगा किंवा मुलगी बाहेरून शांत दिसली तरी आतून दमलेली, संवेदनशील किंवा अस्वस्थ असू शकते. अशावेळी लगेच पेपरचे विश्लेषण, चुका, अपेक्षित गुण यावर चर्चा सुरू झाली तर मेंदूला नकळत “मूल्यांकन” झाल्याची जाणीव होते. परिणामी चिडचिड, गप्प बसणं किंवा “पेपर खराब झाला” अशा प्रतिक्रिया दिसू शकतात.
यासाठी छोटासा पण प्रभावी बदल उपयुक्त ठरतो. पेपरनंतर काही काळ मुलाला ‘डी-कंप्रेशन’ वेळ द्यावा. लगेच प्रश्नपत्रिका किंवा गुणांवर चर्चा टाळावी. त्या ऐवजी “आता कसं वाटतंय?”, “थकलास/थकली असशील — आधी आराम करूया” असे संवाद अधिक आधार देणारे ठरतात. जर मुलाने स्वतःहून पेपरबद्दल चिंता व्यक्त केली, तर त्या क्षणी चौकशीपेक्षा समजून घेणं महत्त्वाचं असतं. “ठीक आहे, एक पेपर सर्वकाही ठरवत नाही” असा प्रतिसाद आत्मविश्वास टिकवतो. चुका व सुधारणा भावना स्थिर झाल्यावर शांतपणे चर्चिल्यास ती अधिक परिणामकारक ठरते.
पेपरनंतर मित्रांमध्ये उत्तरांची तुलना हा देखील ताण वाढवणारा घटक असतो. इतरांनी काय लिहिलं यावरून मुलाच्या मनात शंका व घबराट वाढू शकते. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो, हे मुलांना समजावून सांगणं आवश्यक आहे.
या सगळ्या प्रक्रियेकडे “Neuro Parenting” या दृष्टिकोनातून पाहिल्यास एक महत्त्वाचं तत्त्व समोर येतं — मुलांचं वर्तन हे केवळ प्रयत्नांचं प्रतिबिंब नसून त्यांच्या मेंदूच्या त्या क्षणातील भावनिक अवस्थेशी जोडलेलं असतं. Neuro Parenting मध्ये सांगितलं जाणारं मूलभूत सूत्र आहे — “Connection before Correction.” म्हणजेच, विश्लेषण किंवा दुरुस्तीपूर्वी भावनिक जोड निर्माण करणं. जेव्हा मुलाला सुरक्षितता व स्वीकाराची जाणीव होते, तेव्हाच त्याचा मेंदू शिकण्यासाठी व सुधारण्यासाठी खऱ्या अर्थाने तयार होतो.
परीक्षा ज्ञानाची असते; पण पेपरनंतरचा संवाद — भावनिक बुद्धिमत्तेची.

