विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने विद्या प्रतिष्ठान इंदापूर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता पाचवी ते आठवी व अकरावीतील सर्व विद्यार्थी व शिक्षक या कार्यक्रमास उपस्थित होते.
या व्याख्यानासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ह. भ. प. तानाजी महाराज पांडुळे यांना आमंत्रित करण्यात आले होते. ते व्यसनमुक्त युवक संघटनेचे माजी तालुका अध्यक्ष असून प्रसिद्ध व्याख्याते, कीर्तनकार आणि कवी म्हणून ओळखले जातात. व्यसनमुक्ती विषयावर त्यांच्या अनेक कविता व प्रबोधनपर विचार समाजात विशेष गाजले आहेत.
“अमली पदार्थांचे दुष्परिणाम या संदर्भात जनजागृती” हा या व्याख्यानाचा मुख्य विषय होता. विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम समजावून सांगणे व त्यांना व्यसनापासून दूर ठेवणे हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
आपल्या प्रभावी वक्तृत्वातून ह. भ. प . तानाजी पांडुळे महाराजांनी विद्यार्थ्यांना व्यसनामुळे होणारे आयुष्यावरील घातक परिणाम पटवून दिले. “निरोगी शरीरातच निरोगी मन वसते” हा संदेश देत त्यांनी विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी अंगीकारण्याचे व चुकीच्या मार्गापासून दूर राहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमानंतर प्राचार्या डॉ. ज्योती जगताप यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा जनजागृतीपर उपक्रमांची नितांत गरज आहे. या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय नवल यांनी केले. उपस्थित विद्यार्थ्यांनी व्याख्यानास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
