इंदापूर: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पतंजली योग समितीच्या वतीने महिलांसाठी सामूहिक सूर्यनमस्कार प्रशिक्षण व स्पर्धेचे विशेष आयोजन करण्यात आले होते. इंदापूर येथील प्राथमिक शाळा क्रमांक १ व २ या ठिकाणी सुरू असलेल्या योग वर्गामध्ये हा कार्यक्रम पार पडला. या उपक्रमाला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, एकूण ९२ महिलांनी या स्पर्धेत अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश महिलांमध्ये आरोग्य साक्षरता निर्माण करणे हा होता. निरोगी, निरामय व सदृढ आरोग्य, मानसिक स्थैर्य, आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरता लाभलेली महिलाच खऱ्या अर्थाने राष्ट्राचा आधारस्तंभ असते. म्हणूनच, सूर्यनमस्काराच्या माध्यमातून महिलांना शारीरिक व मानसिकदृष्ट्या अधिक सशक्त करण्याचा संदेश या स्पर्धेद्वारे देण्यात आला.
सदर स्पर्धा चार वेगवेगळ्या वयोगटांमध्ये घेण्यात आली, जेणेकरून सर्व वयोगटातील महिलांना त्यांच्या क्षमतेनुसार कसब दाखवता आले. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. कल्पना खाडे व लता नायकुडे यांच्या हस्ते ट्रॉफी, सहभाग प्रमाणपत्र आणि गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ. खाडे यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधताना त्यांना महिला दिनाच्या आरोग्यदायी शुभेच्छा दिल्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पतंजली योग समितीच्या अनेक पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यामध्ये प्रामुख्याने युवा प्रभारी सचिन पवार, रामेश्वरजी साठे, प्रसाद गारटकर, बिभिषन खबाले, अशोक अनपट आणि भालचंद्र भोसले यांचा समावेश होता. तसेच, महिला योग समितीच्या सर्व महिला सदस्यांनी या स्पर्धेच्या नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन शरद झोळ यांनी केले, तर उपस्थितांचे आणि सहकार्य करणाऱ्यांचे आभार प्रदर्शन सायराभाभी आत्तार यांनी मानले. या उपक्रमामुळे इंदापूर परिसरातील महिलांमध्ये योगासने आणि आरोग्याप्रति एक नवी चेतना निर्माण झाल्याचे दिसून आले.
स्पर्धांमध्ये विजेते स्पर्धक :
वयोगट – १५ ते ३५
१) सृष्टी सुनिल गव्हाणे
२) भाग्यश्री ज्ञानोबा कावळे
३) प्राची पोपट बनकर
वयोगट – ३६ ते ४५
१) सौ. रोहिणी रितेश अभंग
२) सौ. कल्पना राहुल व्यवहारे
३) सौ. वर्षा अनिल नागणे
वयोगट – ४६ ते ५५
१) सौ. उमा पांडुरंग झोळ .
२) सौ. डॉ. कल्पना मिलिंद खाडे
३) सौ. मनीषा पोपट बनकर
वयोगट – ५६ ते पुढे
१) सौ. जयश्री जीवन सरवदे
२) सौ. मंगल सराशिव गायकवाड
३) सौ. मीनाक्षी नंदकुमार सातारकर
सर्व सहभागी महिलांचे व विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले.
