इंदापूर (प्रतिनिधी: गणेश धनवडे):
ग्रामीण जीवन, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि निसर्गभावना आपल्या लेखणीतून प्रभावीपणे मांडणारे प्रसिद्ध रानकवी हनुमंत चांदगुडे यांनी इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानच्या विश्वासराव रणसिंग महाविद्यालय (कळंब) येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मराठी विभागाच्या वतीने आयोजित 'मृदू कौशल्य श्रेयांक अभ्यासक्रम' अंतर्गत 'व्यक्तीमत्व विकास आणि काव्यमय संवाद कौशल्ये' या विषयावर त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे सचिव विरसिंह रणसिंग यांनी रानकवी हनुमंत चांदगुडे यांचे यथोचित स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य अशोक काळंगे, मुख्याध्यापक प्रमोद भोंग, मुख्याध्यापक महादेव बागल, उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग, प्राध्यापक डॉ. विजय केसकर, प्रा. विनायक शिंदे यांच्यासह इतर मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकरी संवेदना आणि 'बांधावरील कविता' विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कवी चांदगुडे यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसारखा संवेदनशील विषय कवितेच्या माध्यमातून मांडला. शेतकऱ्यांच्या वेदना, वाढता कर्जबाजारीपणा, निसर्गाची अनिश्चितता आणि समाजाची या प्रश्नांमधील जबाबदारी यावर भाष्य करत त्यांनी तरुणांना सामाजिक जाणीव जागृत ठेवण्याचे आवाहन केले.
“बांधावरील कविता” ही संकल्पना स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, ग्रामीण जीवनातील साधेपणा, मातीशी असलेले घट्ट नाते आणि सखोल निसर्ग निरीक्षणातूनच कविता जन्म घेते. प्रत्यक्ष अनुभव आणि मनातील भावनांची सहज अभिव्यक्ती म्हणजे कविता असल्याचे त्यांनी उदाहरणांसह पटवून दिले.
“कविता हे केवळ साहित्य नसून ते प्रभावी संवादाचे एक सशक्त माध्यम आहे. योग्य शब्दांची निवड, भावनिक अभिव्यक्ती आणि सामाजिक भान राखल्यास व्यक्तीमत्व विकासाला मोठी मदत होते,” असेही चांदगुडे यांनी नमूद केले. उपस्थित विद्यार्थ्यांनी या काव्यमय संवादात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून संवाद कौशल्याचे बारकावे समजून घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विजय केसकर यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. सुवर्णा बनसोडे यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. ज्ञानेश्वर गुळीग यांनी मानले.

