इंदापूर, २२ एप्रिल: शंकरराव पाटील चॅरीटेबल ट्रस्ट आणि अल्फा बाईट कॉम्प्यूटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. २२ एप्रिल २०२६ रोजी, सीबीएसई (CBSE) बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव डॉ.गीरीश देसाई, खजिनदार श्रो.तुषार रंजनकर व विश्वस्त श्री.अरविंद गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली अल्फा बाईट येथील हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या विशेष कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून रोटरी क्लब ऑफ इंदापूरचे अध्यक्ष रो. नितीन शहा आणि संचालक रो. राकेश गानबोटे उपस्थित होते. मान्यवर अतिथींसह शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे खजिनदार श्री. तुषार रंजनकर आणि विश्वस्त श्री. अरविंद गारटकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी श्लोक इंगुले, सोनिश शहा, राही गानबोटे, समृद्धी गायकवाड, आदित्य बनगर, सार्थक गवळी, अंकिता शिंदे, तन्वी गाडेकर आणि वैष्णवी साळुंखे या यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
याप्रसंगी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना व त्यांना मार्गदर्शन करताना ट्रस्टचे खजिनदार श्री. तुषार रंजनकर म्हणाले, "आजच्या या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता, नवनवीन कौशल्ये आणि आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणे काळाची गरज आहे. आज ज्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान झाला, त्यांचे यश इतर सर्व विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. या सर्वांनी भविष्यातही आपल्या कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करावीत, याच त्यांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा."
कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालकांची उपस्थिती होती. या संपूर्ण कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विश्वस्त श्री. अरविंद गारटकर तर सूत्रसंचालन संस्थेचे प्रकल्प अधिकारी सागर कांबळे यांनी केले.
