इंदापूर (प्रतिनिधी - श्री. गणेश धनवडे ): इंदापूर तालुक्यातील क्रीडा क्षेत्रासाठी अत्यंत अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित कळंब येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाची विद्यार्थिनी अहिल्या शत्रुघ्न शिंदे हिने कुस्तीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी झेप घेतली आहे. भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीने आयोजित निवड चाचणीत यश मिळवून तिने आशियाई कुस्ती स्पर्धेत आपले स्थान पक्के केले असून, अशी कामगिरी करणारी ती महाविद्यालयाची पहिलीच खेळाडू ठरली आहे.
दिल्ली येथे नुकतीच या स्पर्धेसाठी राष्ट्रीय स्तरावरील निवड चाचणी पार पडली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या चाचणीत अहिल्याने ५५ किलो वजन गटात सहभाग घेतला होता. या गटात देशभरातील अनेक नामांकित आणि अनुभवी मल्लांचे आव्हान तिच्यासमोर होते. मात्र, आपल्या तंत्रशुद्ध खेळाच्या जोरावर आणि जबरदस्त आत्मविश्वासाने तिने अनेक दिग्गज खेळाडूंना पराभूत केले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील निवडीसाठी आपली दावेदारी यशस्वीपणे सिद्ध केली.
अहिल्याची ही निवड २३ वर्षांखालील (U-23) आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. ही प्रतिष्ठेची स्पर्धा येत्या २३ मे ते ३१ मे या कालावधीत व्हिएतनाम या देशात संपन्न होणार आहे. जागतिक स्तरावरील या स्पर्धेत अहिल्या आता भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे. ग्रामीण भागातील एका विद्यार्थिनीने थेट आंतरराष्ट्रीय मॅटवर मजल मारल्याने तालुक्याच्या क्रीडा वैभवात मोठी भर पडली आहे.
अहिल्याच्या या यशामागे तिचे कष्ट आणि महाविद्यालयाचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाच्या इतिहासात आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारी ती पहिलीच खेळाडू ठरल्याने शिक्षण प्रसारक मंडळ आणि क्रीडा वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे. शारीरिक शिक्षण संचालक डॉ. सुहास भैरट आणि प्रशिक्षकांचे तिला विशेष मार्गदर्शन लाभले असून, तिच्या या यशामुळे अन्य ग्रामीण खेळाडूंनाही मोठी प्रेरणा मिळाली आहे.
या ऐतिहासिक यशाबद्दल इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आनंदी रणसिंग, उपाध्यक्ष प्रकाश कदम, सचिव विरसिंह रणसिंग, खजिनदार वीरबाला पाटील आणि विश्वस्त मंडळातील सर्व सदस्यांनी अहिल्याचे अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काळंगे यांनी तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या असून, व्हिएतनाममधील स्पर्धेत ती सुवर्णपदक पटकावेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
