इंदापूर / चांडगाव: उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील चांडगाव येथून एक बातमी समोर आली आहे. येथील स्थानिक मच्छीमार युवक योगेश मनिराम खानेवाले हे धरणात मासेमारी करत असताना, त्यांच्या जाळ्यात २५ किलो वजनाचा कटला जातीचा मासा सापडला. सध्या उजनी धरणात मोठ्या आकाराचे मासे मिळण्याचे प्रमाण कमी झाले असताना, योगेश यांच्या जाळ्यात या वजनाचा मासा लागल्याने परिसरातील मच्छीमार बांधवांमध्ये याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.
हा कटला मासा पकडल्यानंतर योगेश यांनी तो विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या भिगवण मच्छी बाजारात आणला होता. २५ किलो वजनाचा मासा पाहण्यासाठी बाजारात ग्राहकांनी आणि इतर व्यापाऱ्यांनी गर्दी केली होती. अखेर या माशाला २७० रुपये प्रति किलो या दराने एकूण ६ हजार ७५० रुपये इतका चांगला बाजारभाव मिळाला. या माशाच्या विक्रीतून चांगली आर्थिक कमाई झाली.
या माशाच्या विक्रीविषयी आणि धरणातील सद्यस्थितीबद्दल बोलताना योगेश खानेवाले यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, सध्या उजनीच्या विस्तीर्ण जलाशयात प्रामुख्याने फक्त 'चिलापी' जातीचेच लहान व मध्यम आकाराचे मासे मोठ्या प्रमाणावर सापडतात. मात्र, साधारण २० वर्षांपूर्वी जेव्हा आमचे वडील याच धरणात मासेमारी करायचे, तेव्हा उजनीमध्ये मरळ, रोहू, वाम आणि शिंगाडा यांसारखे देशी व दर्जेदार मासे अतिशय चांगल्या प्रकारे आणि मोठ्या प्रमाणात सापडायचे. गेल्या काही वर्षांत धरणातील परिस्थिती बदलली असून अशा पारंपरिक मोठ्या माशांचे प्रमाण कमालीचे घटले आहे.
उजनी धरणातील मोठ्या माशांचे प्रमाण कमी होण्यामागचे मुख्य कारण स्पष्ट करताना योगेश यांनी चिंता व्यक्त केली. त्यांच्या मते, धरणावर मासेमाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस लक्षणीयरीत्या वाढत चालली आहे. या वाढत्या संख्येमुळे स्थानिक मच्छीमारांच्या व्यवसायावर मर्यादा येत असून, वाढत्या मासेमारीमुळे उजनीच्या जलाशयातील कटला, रोहू आणि मरळ सारख्या मोठ्या माशांचे प्रमाण खूपच कमी झाले आहे.
