इंदापूर, डॉ. संदेश शहा
इंदापूर येथील वृक्षप्रेमी सामाजिक संस्था तसेच तालुकास्तरीय क्रीडा संकुल, इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका क्रीडा संकुल परिसरामध्ये ७४ झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. इंदापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमेश ढगे यांचा देखील वाढदिवस यावेळी पर्यावरण पुरक पद्धतीने साजरा करण्यात आला. नगराध्यक्ष भरत शहा, नगरपरिषद मुख्याधिकारी रमेश ढगे, नगरपरिषद गट नेते शकील सय्यद, नगरसेवक अक्षय सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा अभिनव उपक्रम पार पडला.
यावेळी नगराध्यक्ष भरत शहा म्हणाले, सध्या सगळेच जण आपला वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करतात. परंतु इंदापूर वृक्षप्रेमी सामाजिक संस्थेने गेल्यावर्षी लावून संवर्धन केलेल्या ७४ झाडांचा वाढदिवस साजरा करून पर्यावरण संतुलन करण्याचा संदेश दिला आहे. आगामी काळात या संस्थेच्या वृक्षारोपण या उपक्रमास सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. नगरपरिषद मुख्याधिकारी रमेश ढगे म्हणाले, सध्या हवा, पाणी तसेच अन्न विविध घटकांमुळे दूषित झाले असल्याने आपल्याला पुरेसा प्राणवायू मिळत नाही. त्याप्रश्वभूमीवर पर्यावरण संतुलन करण्यासाठी युवाशक्तीने एकत्र येऊन झाडांचा वाढदिवस हा उपक्रम साजरा केला आहे. त्याचा आदर्श सर्वांनी घेणे ही काळाची गरज आहे.
इंदापूर येथील वृक्षप्रेमी सामाजिक संस्थेच्या वतीने पहिल्या टप्प्यात दि. ११ जून २०२५ रोजी ७४ झाडांची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यात आले. दि. ११ जून २०२६ पर्यंत वृक्षप्रेमी सामाजिक संस्था, क्रीडा संकुल अधिकारी, कर्मचारी वर्ग यांच्या संयुक्तपणे या झाडांचे संगोपन केल्यानंतर आज त्यांना पाल्याप्रमाणे फुगे, रेबीन, हार घालून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. क्रीडा संकुल अधिकारी महेश चावले यांच्या वतीने ३५० च्या आसपास झाडांचे लागवड आणि सदर झाडांना उच्च प्रतीचे ठिबक अंडरग्राउंड स्वरूपात करून सदर झाडाचेही संगोपन संस्थेच्या आणि क्रीडा संकुल कर्मचाऱ्यांच्या वतीने एक वर्ष करण्यात आले, त्यामुळे सर्वच्या सर्व झाडे अतिशय छान पद्धतीने वाढत आहेत.
यावेळी नगरपालिका उद्यान प्रमुख अशोक चिंचकर, क्रीडा संकुल कर्मचारी अशोक करे, उमेश चिंचकर, पोलीस डिपार्टमेंटचे आप्पासाहेब हेगडे, सुधीर काळे, संतोष शिंदे, आयटीआय शिक्षक श्री. विभुते सर, वृक्षप्रेमी सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा स्वागत सत्कार दंत रोग चिकित्सक डॉ. अरुण गार्डे, इंदापूर भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष धरमचंद लोढा, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र माने यांच्या वतीने करण्यात आले.
