इंदापूर, डॉ. संदेश शहा
सन २०१२ मध्ये महात्मा फुलेनगर बिजवडी ( ता. इंदापूर ) परिसरात झालेल्या राज्यव्यापी ऊसदराच्या आंदोलनादरम्यान इंदापूर न्यायालयात दाखल झालेल्या ८ गुन्ह्यांपैकी ३ महत्त्वाच्या गुन्ह्यांचा निकाल लागला आहे. इंदापूर न्यायालयाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार सदाभाऊ खोत, सतिशभैय्या काकडे, निलेश देवकर यांच्यासह ५१ आंदोलकांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. एच. फारूकी यांनी हा निकाल दिला. सन २०१२ साली ऐन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर उसाला प्रतिटन २७०० रुपये पहिली उचल मिळावी, या मागणीसाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या होत्या. त्यावेळी तत्कालीन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुढाकार घेऊन तोडगा काढावा, या मागणी साठी त्यांच्या कर्मयोगी साखर कारखान्यावर धरणे आंदोलन करण्यात आले होते. राज्यातील साखर कारखानदारांनी दर जाहीर करण्यास नकार दिल्यामुळे हे आंदोलन अधिक तीव्र झाले होते.
हे आंदोलन चिघळल्याने आंदोलनादरम्यान पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर झालेला रास्ता रोको ऐतिहासिक ठरला. याच संघर्षात नरूटवाडी येथील कुंडलिक कोकाटे या तरुण शेतकऱ्याला आपले प्राण गमवावे लागले. या घटनेनंतर आंदोलनाचा वणवा राज्यभर पेटला आणि पोलिसांनी शेकडो शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले होते. इंदापूर तालुक्यात एकूण ८ गुन्हे नोंदवण्यात आले होते.
जवळपास आठवडाभर चाललेल्या या तीव्र संघर्षानंतर राजारामबापू कारखान्याने २५०० रुपये पहिली उचल जाहीर करून उसाच्या दराची कोंडी फोडली. या आंदोलनामुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ३०० रुपये जादा दर मिळवून देण्यात यश आल्याने आंदोलन यशस्वी झाल्याचे समजले जाते. या आंदोलनात आंदोलकांना कायदेशीर लढाईला सामोरे जावे लागले असले तरी आर्थिकदृष्ट्या हा लढा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरला. इंदापूर न्यायालयात या प्रकरणाचे कामकाज पाहताना शेतकरी हितासाठी वकील बांधवांनी मोलाची साथ दिली. ॲड. एन. जे. शहा, ॲड. महेश ढुके, ॲड. श्रीकांत करे, ॲड. सचिन राऊत आणि ॲड. नवनाथ सोनटक्के यांनी या ५१ आंदोलकांची बाजू न्यायालयात विनामूल्य मांडली. पुराव्यांच्या अभावी न्यायालयाने सर्व आंदोलकांना दोषमुक्त केल्याने शेतकरी संघटनांनी या निकालाचे स्वागत केले आहे.

