इंदापूर - डॉ. संदेश शहा
इंदापूर शहरातून होणारी अवजड ऊस वाहतूक सध्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असून यावर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी अशी नागरिकांमधून मागणी होत आहे. काही वर्षांपूर्वी एका महाविद्यालयीन तरुणीचा ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटने नंतर शहरात प्रचंड जनक्षोभ उसळला होता, ज्याची दखल घेत प्रशासनाने ऊस वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना शहरात येण्यास बंदी घातली होती. मात्र, सध्या भरलेले आणि रिकामे ट्रॅक्टर पुन्हा शहराच्या मुख्य रस्त्या वरून धावू लागले आहेत. इंदापूर शहरातून जुना पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग जात असून या महामार्गावर बस स्टँड, पंचायत समिती, न्यायालय, महाविद्यालय, शाळा, इंदापूर नगरपरिषद, पोलीस ठाणे, वाहतूक संघ, बँक, पतसंस्था आदी महत्वाची कार्यालये आहेत. त्यामुळे हा रस्ता अत्यंत वर्दळीचा बनला असून या रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असते. खरे तर इंदापूर नगरपरिषद, पोलिस स्टेशन वाहतूक खाते तसेच आरटीओ विभागाने पार्किंग झोन तसेच वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यातच सद्यस्थितीत इंदापूरच्या मुख्य रस्त्यावरून आणि वर्दळीच्या चौकाचौकातून ऊसाचे ओव्हरलोड ट्रॅक्टर जात असल्याने अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. बाह्यवळण मार्ग ( बायपास ) उपलब्ध असतानाही वेळ आणि इंधन वाचवण्यासाठी अनेक चालक शहराचा अंतर्गत मार्ग वापरत आहेत. यामुळे पादचारी, शालेय विद्यार्थी, जेष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे जुन्या अपघाताची पुनरावृत्ती होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. वाढत्या वाहतुकीमुळे नागरिक प्रशासनाच्या या सुस्त कारभारावर संताप व्यक्त करत आहेत. त्यामुळे अधिकारी सुस्त तर जनता मात्र त्रस्त अशी परिस्थिती झाली आहे.
वाहतुकीच्या धोक्या सोबतच ध्वनी प्रदूषणाचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या अनेक ट्रॅक्टरवर मोठ्या क्षमतेचे साऊंड सिस्टिम बसवण्यात आले असून, अत्यंत कर्णकर्कश आवाजात गाणी वाजवली जातात. या आवाजामुळे रस्त्यावरील इतर वाहनचालकांचे लक्ष विचलित होत असून, शहरातील रुग्णालय परिसरातील शांततेचा भंग होत आहे. या कर्कश्य संगीतामुळे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून, यावर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. वेगवेगळ्या निघणाऱ्या मिरवणुकीमध्ये डी जे चा आवाज वाढत चालला असून त्यावर कोणाचेही नियंत्रण राहिले नाही. खरे तर नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे अन्यथा या ध्वनी प्रदूषणाचे व तीव्र आवाजाचे जेष्ठ नागरिक बळी ठरू शकतात. त्यामुळे कडक प्रतिबंधात्मक कारवाई होणे गरजेचे आहे. अवजड ऊस वाहतुकी मुळे इंदापूर शहरात दिवसातून अनेकदा वाहतूक कोंडीच्या समस्या उद्भवत आहेत. एका मागे एक येणाऱ्या दोन-दोन ट्रॉलीच्या ट्रॅक्टरमुळे मुख्य रस्ते अडकून पडतात, ज्याचा फटका रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवांना बसत आहे. शहरातील अरुंद रस्ते आणि त्यात या अवजड वाहनांची घुसखोरी यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत असून, सामान्य नागरिकांचा मौल्यवान वेळ वाया जात आहे. यामुळे स्थानिक व्यापारी आणि ग्राहकांमध्येही नाराजीचे वातावरण आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. शहर प्रवेशद्वारावरच ऊस वाहतूक रोखण्यासाठी पोलीस तैनात करणे, नियम मोडणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई करणे आणि बाह्यवळण मार्गाचा वापर सक्तीचा करणे गरजेचे आहे. जर प्रशासनाने वेळेत उपाययोजना केल्या नाहीत, तर पुन्हा एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता पोलीस आणि आरटीओ विभाग या समस्येकडे गांभीर्याने पाहणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नगरपरिषदेने पुढाकार घेऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी जागा देणे, पे अँड पार्क उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसेच नागरिकांनी देखील स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे. नगरपरिषद निवडणुकीचा निकाल दिनांक २१ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. त्यानंतर सत्तेवर येणाऱ्या नगराध्यक्ष व नगरसेवकांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
