इंदापूर प्रतिनिधी गणेश धनवडे
कळंब : इंदापूर तालुक्यातील कळंब येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात संस्थेचे सचिव वीरसिंह रणसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसीय स्वच्छता मोहिमेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) वतीने राबवण्यात आलेल्या या मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांनी संपूर्ण महाविद्यालय परिसर स्वच्छ केला. या उपक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. राजेंद्रकुमार डांगे यांनी केले, ज्यामध्ये त्यांनी मोहिमेचा मुख्य उद्देश स्पष्ट केला.
विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काळंगे, उपप्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर गुळिग आणि डॉ. प्रशांत शिंदे यांनी मोहिमेला भेट दिली. यावेळी मार्गदर्शन करताना उपप्राचार्य डॉ. प्रशांत शिंदे म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजना ही केवळ एक उपक्रम नसून ती आयुष्यभराची शिदोरी आहे. भिंतीबाहेरचे शिक्षण घेण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी ही योजना अत्यंत प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्राचार्य डॉ. अशोक काळंगे यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन काम केल्यामुळे त्यांच्यात सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण होते आणि नेतृत्व गुण वाढीस लागतात. समाजाच्या आणि देशाच्या विकासासाठी तरुणांनी अशा उपक्रमात सक्रिय सहभाग घेणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश दिला.
या मोहिमेत डॉ. संदीप पवार, प्रा. धुळदेव वाघमोडे, समिती सदस्य डॉ. अमर वाघमोडे, प्रा. रवी गायकवाड, प्रा. सोमनाथ चव्हाण, प्रा. महादेव माळवे आणि प्रा. आकांक्षा मेटकरी हे सर्व मान्यवर उपस्थित होते. महाविद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाची सांगता प्रा. सुवर्णा बनसोडे यांनी मानलेल्या आभार प्रदर्शनाने झाली.
