इंदापूर (प्रतिनिधी: गणेश धनवडे): इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथील दत्त मंदिरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या मंगलमयी दिनाचे औचित्य साधून गावातून श्री स्वामी समर्थांच्या पादुकांची भव्य ग्राम प्रदक्षिणा काढण्यात आली होती. 'श्री स्वामी समर्थ' नामाच्या जयघोषाने संपूर्ण निमसाखर परिसर भक्तिमय झाला होता. नवीन वर्षाचा संकल्प म्हणून स्वामींच्या आरतीसाठी नवीन पालखी आणि नगारा मशीन आणण्यात आली असून, यामुळे मंदिरातील दैनंदिन उपासनेत आता आधुनिकता आणि भव्यतेची जोड मिळाली आहे.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे नवीन पालखी व नगारा मशीनचा लोकार्पण सोहळा. निमसाखर गावचे सरपंच श्री. धैर्यशील विजयसिंह रणवरे पाटील यांच्या शुभहस्ते हे लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना सरपंचांनी ग्रामस्थांच्या या धार्मिक उपक्रमाचे कौतुक केले. संध्याकाळी हरिभक्त परायण श्रीकांत महाराज गलांडे यांचे 'स्वामी चरित्र' या विषयावर अभ्यासपूर्ण प्रवचन संपन्न झाले. या प्रवचनातून महाराजांनी स्वामी समर्थांच्या जीवनातील विविध प्रसंग आणि त्यांच्या शिकवणीवर प्रकाश टाकला, ज्याचा लाभ उपस्थित शेकडो स्वामी भक्तांनी घेतला.
या कार्यक्रमास वालचंद नगर येथील ज्येष्ठ स्वामीभक्त श्री. राम कुंभार सर यांची विशेष उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाच्या ओघात ह.भ.प. श्रीकांत महाराज गलांडे यांच्या हस्ते पत्रकार गणेश धनवडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सोहळ्याची सांगता महाप्रसादाने झाली, ज्याचे आयोजन श्री. सुनील हनुमंतराव मोरे यांच्या वतीने करण्यात आले होते. या संपूर्ण कार्यक्रमासाठी निमसाखर आणि परिसरातील स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यामुळे या सोहळ्याला मोठ्या उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते.
