इंदापूर, डॉ. संदेश शहा
महिला स्वयंसहायता समूहाचे सक्षमीकरण करणे गरजेचे असून बँकांचे विना तारण कर्ज मिळणे हे महिलांच्या उत्तम व्यवहाराचे प्रतिक आहे. त्यामुळे मिळालेल्या कर्जाचा सदुपयोग करून महिला स्वयंसहायता समूहाने आत्मनिर्भर होणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत इंदापूर तालुक्यातील १६७ महिला स्वयं सहाय्यता समूहांना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ७ कोटी ८५ लाख रुपयांचे बँकेचे कर्ज इंदापूर येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात वितरित करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
महाराष्ट्र बँकेचे विभागीय अधिकारी आनंद थोरात, गटविकास अधिकारी सचिन खुडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले, उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक सचिन बाबर आदि मान्यवर या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कृषिमंत्री भरणे पुढे म्हणाले, महिलांच्या कार्याची दखल राज्यानेच नव्हे तर संपूर्ण जगाने घेतली आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेने २०२६ हे वर्ष आंतराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केले आहे.
महिला स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून तालुक्यामध्ये उत्तम काम चालू आहे.महिला कोणता ही समूह एनपीएमध्ये जाऊ देत नाहीत. त्यामध्ये सीआरपीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे समूह व्यवस्थित चालू आहेत. बँकांची अथवा इतर कोणती ही अडचण असेल तर एक भाऊ म्हणून मी कायमस्वरुपी तुमच्यासोबत असेन अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. गटविकास अधिकारी सचिन खुडे प्रास्ताविक करताना म्हणाले, गत वर्षात तालुक्याला ३३ कोटी रुपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते मात्र आत्तापर्यंत तालुक्याने ३१ कोटी रुपयांचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. पुढील महिन्यापर्यंत शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. महिला स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून महिलांनी वेगवेगळे व्यवसाय उभा केले आहेत. त्यातून त्या उद्योजिका होत आहेत. येणाऱ्या काळात लखपती दीदी मोठया उद्योजक होतील अशी ग्वाही त्यांनी दिली. समाधान भोरकडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. बँकेचे अधिकारी महेश शेळके, वैभव लाहोत, अमोल वाघमारे, शरद सूळ, रोहिदास राठोड,अशोक थोरात, जयदीप तोरणे, अशोक भिसे यावेळी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर राऊत, अमर कदम,चेतन रांजणकर, राणी ननवरे, आदित्य मांदळे,अमोल गलांडे, सुनिता दातखिळे, निर्मला निमगिरे, तेजस्विनी शिंदे यांनी प्रयत्न केले.

