वरकुटे बुद्रुक (प्रतिनिधी):
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोंढे वस्ती आणि वरकुटे बुद्रुक यांच्या दरम्यान सिमेंट वाहतूक करणाऱ्या एका टँकरचा भीषण अपघात झाला. हा टँकर मुख्य रस्त्यावरच आडवा झाल्याने महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. मात्र, अपघाताच्या भीषणतेत केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला स्थानिक तरुणांनी मोठ्या शिताफीने बाहेर काढल्याने अनर्थ टळला.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सिमेंटची वाहतूक करणारा टँकर सोलापूरच्या दिशेने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने लोंढे वस्तीजवळ उलटला. टँकर रस्त्याच्या मधोमध आडवा पडल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. अपघात इतका भीषण होता की, टँकरच्या केबिनचा पुढचा भाग पूर्णपणे चेपला गेला होता. यामध्ये चालक गंभीर जखमी अवस्थेत आत अडकून पडला होता.
तरुणांचे प्रसंगावधान अन् टँकरची केबिन ओढली
अपघात घडताच महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनी आणि स्थानिक तरुणांनी मदतीसाठी धाव घेतली. केबिन पूर्णपणे दबली गेल्याने चालकाला बाहेर काढणे कठीण झाले होते. वेळ निघून जात असल्याचे पाहून तरुणांनी तात्काळ एका ट्रॅक्टरची मदत घेतली. ट्रॅक्टरच्या साहाय्याने दोरखंड लावून दबलेली केबिन ओढून बाहेर काढण्यात आली. त्यानंतर अत्यंत सावधगिरीने चालकाला सुखालुपणे बाहेर काढण्यात आले.
वाहतुकीचा खोळंबा
टँकर मुख्य रस्त्यावर आडवा झाल्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन क्रेनच्या साहाय्याने टँकर बाजूला करण्याचे काम हाती घेतले. जखमी चालकाला तत्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्या आले आहे. वेळेवर मदत करणाऱ्या त्या निनावी तरुणांच्या धाडसामुळे एका व्यक्तीचे प्राण वाचले, ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

