इंदापूर (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच वाचनाची ओढ निर्माण व्हावी आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा, या उद्देशाने वासंती शामसुंदर जावडेकर ट्रस्टच्या वतीने वरकुटे बुद्रुक केंद्रामधील १४ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना संस्कारक्षम पुस्तकांचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम शुक्रवार, दि. २२ जानेवारी २०२६ रोजी दुपारी 12 वाजता संपन्न झाला. ट्रस्टचे विश्वस्त पद्माकर जावडेकर यांच्या प्रेरणेने 'गुरुवर्य शंकरराव जावडेकर पुस्तक वितरण उपक्रम' अंतर्गत या दर्जेदार साहित्याचे वाटप करण्यात आले असून, यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचे दरवाजे उघडण्यास मदत होणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजन अतिशय उत्साहात करण्यात आले असून यावेळी प्रभारी केंद्रप्रमुख बाळासाहेब डांगे, केंद्र समन्वयक संभाजी सूर्यवंशी, ट्रस्टचे विश्वस्त प्रा. अरविंद गारटकर, मार्गदर्शक हमीदभाई आत्तार, महादेव चव्हाण आणि भारत बोराटे हे मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते शाळांच्या प्रतिनिधींना पुस्तकांचे संच सुपूर्द करण्यात आले. केवळ शालेय शिक्षणच नव्हे तर अवांतर वाचनातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी, असा सूर यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.
जावडेकर ट्रस्टच्या या सामाजिक कार्याचा विस्तार इंदापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येत आहे. चालू शैक्षणिक वर्षात आजपर्यंत तालुक्यातील एकूण ६५ जिल्हा परिषद शाळांमध्ये २३१० संस्कारक्षम पुस्तके पोहोचवण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, केवळ वरकुटे केंद्रच नव्हे तर इंदापूर तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत हा उपक्रम राबवून सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून देण्याचा ट्रस्टचा मानस असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
केवळ ज्ञानदानच नव्हे तर चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी यावेळी केंद्रातील सर्व शाळांमधील मुलांना खाऊचेही वाटप करण्यात आले. पुस्तकांसोबतच खाऊ मिळाल्याने विद्यार्थ्यांनी मोठा आनंद व्यक्त केला. वाचनाची गोडी लागण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम शाळांमध्ये राबवणे काळाची गरज असून, यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वरकुटे शाळेच्या मुख्याध्यापिका विना जाधव यांच्यासह शिक्षक रमेश शेलार, कृष्णा जाधव, सुनिता काजळे, तुकाराम बुटे, अजय बनकर, बालाजी कलवले, हरीश काळेल, मोहन भगत, प्रताप भगत, विश्वास पोळ, अमोल बोराटे, सुग्रीव कांबळे, राहूल पिसाळ, सचिन अभंग आणि विकास वायाळ यांनी परिश्रम घेतले. केंद्रातील सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत हा स्तुत्य उपक्रम संपन्न झाला असून पालकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले आहे.

