इंदापूर - पुणे : डॉ. संदेश शहा
नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या निरंतर शिक्षण व व्यावसायिक शिक्षण विद्याशाखेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘कार्यालयीन सहाय्यक ( न्यायिक ) लिपिक संवर्ग पदविका’ या कौशल्याधिष्ठित शिक्षणक्रमाचा शुभारंभ रविवार दि. ११ जानेवारी २०२६ रोजी विद्यापीठाच्या शैक्षणिक सभागृहात उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे न्यायमूर्ती संदीपकुमार मोरे व न्यायमूर्ती अभय मंत्री प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे होते. यावेळी महाराष्ट्र व गोवा राज्य बार कौन्सिलचे अध्यक्ष हर्षद निंबाळकर, नाशिकचे प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीचंद जगमलानी, निफाडचे जिल्हा न्यायाधीश अ. अ. अ. शेख, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, निफाड वकील संघाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. इंद्रभान रायते, निरंतर शिक्षण, व्यावसायिक शिक्षण व कौशल्य विकास विद्याशाखेचे संचालक प्रा. डॉ. जयदीप निकम हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी न्यायमूर्ती संदीपकुमार मोरे म्हणाले, डॉक्टर इंजिनिअर या पारंपरिक शिक्षणक्रमां पलीकडे अनेक कौशल्याधिष्ठित संधी उपलब्ध आहेत. योग्य प्रशिक्षण घेतल्यास युवकांना चांगल्या रोजगाराच्या संधी मिळू शकतात. मुक्त विद्यापीठाने न्यायव्यवस्थेच्या गरजेनुसार हा शिक्षणक्रम सुरू करून अत्यंत बहुमोल कार्य केले आहे. भविष्यात लघुलेखक ( स्टेनो ) यांसारखे अन्य उपयुक्त अभ्यासक्रम सुरू करावेत असे आवाहन त्यांनी केले.
न्यायमूर्ती अभय मंत्री यांनी मुक्त विद्यापीठाने न्यायव्यवस्थेच्या नेमक्या गरजा ओळखून हा अभ्यासक्रम सुरू केल्याचे गौरवोद्गार काढले. या अभ्यासक्रमा मुळे शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांना रोजगाराचा चांगला पर्याय उपलब्ध होणार असून न्यायालयीन कामकाजात देखील अधिक सुलभता येईल, असे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे म्हणाले, कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमांमुळे न्यायालयीन कामकाजात अचूकता व गती येईल. भविष्यात आणखी व्यावसायिक, रोजगाराभिमुख व कौशल्याधिष्ठित शिक्षणक्रम सुरू करण्यात येतील तसेच विद्यापीठात विधी शाखेचा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही त्यांनी दिली.
बार कौन्सिल ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष जयंत जायभावे म्हणाले, मुक्त विद्यापीठ हे सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचे पंढरपूर आहे. या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना माफक शुल्कात कायदेविषयक दस्तऐवज असलेली ‘वेबबँक’ उपलब्ध करून देण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
महाराष्ट्र व गोवा राज्य बार कौन्सिलचे अध्यक्ष हर्षद निंबाळकर यांनी राज्यभरातील वकिलांनी आपल्या सहाय्यक कर्मचाऱ्यांना या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, असा ठराव करण्यात येईल, अशी माहिती देत प्रवेशित विद्यार्थ्यांना सिव्हिल व क्रिमिनल मॅन्युअल उपलब्ध करून देण्यात येईल, असे सूतोवाच केले.
नाशिकचे प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांनी प्रशिक्षित न्यायिक लिपिक वर्गाचे महत्त्व अधोरेखित केले तर निफाडचे जिल्हा न्यायाधीश श्री. अ. अ. अ. शेख यांनी या अभ्यासक्रमामुळे कायद्याची प्रक्रिया समजून घेण्यास मदत होईल, असे मत व्यक्त केले. पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य सागर वैद्य यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार मुक्त विद्यापीठाची वाटचाल कौतुकास्पद असल्याचे सांगितले. अॅड. इंद्रभान रायते यांनी या शिक्षणक्रमाच्या निर्मितीची पार्श्वभूमी स्पष्ट केली.
प्रास्ताविकात प्रा. डॉ. जयदीप निकम यांनी अभ्यासक्रमाच्या उपयुक्ततेवर प्रकाश टाकला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते या अभ्यासक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या चार पाठ्यपुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी बार कौन्सिलचे सदस्य, न्यायाधीश, विविध वकील संघांचे अध्यक्ष, विधी महाविद्यालयातील प्राध्यापकांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीत व विद्यापीठ गीताने तर समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. सूत्रसंचालन व मान्यवरांचा परिचय डॉ. माधुरी खर्जुल यांनी करून दिला. कार्यक्रमास नाशिक जिल्ह्यातील वकील, प्राध्यापक, विद्यार्थी तसेच विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर पदविका अभ्यासक्रम एक वर्ष मुदतीचा असून तो २४ क्रेडिट्सचा आहे. अभ्यासक्रमात न्यायालयीन कामकाजात मराठी भाषेचा वापर व इतिहास, सामान्य ज्ञान, कार्यालयीन सहाय्यक व प्रात्यक्षिक असे चार विषय समाविष्ट आहेत. अभ्यासक्रमासंदर्भातील सविस्तर माहिती विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे कुलगुरू श्री. सोनवणे यांनी सांगितले.

