इंदापूर, डॉ. संदेश शहा.
पुणे जिल्हा परिषदेच्या दि. ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी इंदापूर तालुक्यातील बावडा - लुमेवाडी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार म्हणून अंकिता हर्षवर्धन पाटील (ठाकरे) यांचा उमेदवार अर्ज इंदापूर तहसील कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे बुधवारी दि. २१ जानेवारी रोजी दाखल करण्यात आला. अंकिता पाटील ठाकरे या राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष तथा माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आहेत. अंकिता पाटील ठाकरे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी हजारो कार्यकर्ते मिरवणुकीने इंदापूर शहरातील दूधगंगा दूध संघ ते तहसिल कार्यालय असे सवाद्य मिरवणुकीने वाजत गाजत येऊन शक्ती प्रदर्शन करण्यात आले. त्यामुळे परिसर दुमदुमून गेला होता. अंकिता पाटील ठाकरे यांचे उमेदवारी अर्ज सुचक उदयसिंह विलासराव पाटील हे आहेत. यावेळी प्रदीपमामा जगदाळे, राजवर्धन पाटील, मनोज पाटील, निरा भिमा कारखान्याचे उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे, बावडा गावच्या सरपंच पल्लवी गिरमे उपस्थित होत्या. यावेळी बावडा लुमेवाडी जिल्हा परिषद गटा अंतर्गत बावडा पंचायत समिती गणातून धनश्री किरण पाटील ( चाकाटी ) व लुमेवाडी पंचायत समिती गटातून शिवाजी विजयसिंह मोहिते (टणु ) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. अंकिता पाटील ठाकरे यांनी मागील निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने विजयी होऊन पुणे जिल्हा परिषदेच्या मावळत्या सभागृहात सुमारे तीन वर्षे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून प्रभावी काम केले आहे. या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या असून तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत रंगणार आहे.
