इंदापूर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वनगळी (ता. इंदापूर) गावाच्या हद्दीत एका अज्ञात वाहनाने जोरात धडक दिल्याने एका कोल्ह्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री किंवा शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रस्त्याच्या कडेला हा कोल्हा मृतावस्थेत पडलेला दिसून आला. वन्यप्राण्याचा अपघात झाल्याचे समजताच स्थानिक नागरिकांनी आणि वाहनचालकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. परिसरातील जागरूक नागरिकांनी या घटनेची माहिती तातडीने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली, जेणेकरून मृत प्राण्याची विल्हेवाट लावून पुढील कार्यवाही करता येईल.
माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वनखात्याने अपघाताच्या ठिकाणची पाहणी केली आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे कोल्ह्याचा जागीच मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. वनविभागाच्या नियमानुसार पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
पुणे-सोलापूर हायवेवर वरकुटे, बळपुडी, बिजवडी, वनगळी आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात माळरान आणि वनक्षेत्र आहे. या भागात कोल्हे, हरीण आणि इतर वन्यजीवांचा मोठा वावर असतो. मात्र, महामार्गावर वाहनांची वर्दळ आणि त्यांचा वेग प्रचंड वाढल्याने रस्ता ओलांडताना या निष्पाप जीवांना आपला प्राण गमवावा लागत आहे.
या घटनेमुळे प्राणीप्रेमींकडून हळहळ व्यक्त केली जात असून, महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. वनक्षेत्र असलेल्या भागात वाहनचालकांनी वेग मर्यादित ठेवावा आणि वनविभागाने अशा संवेदनशील ठिकाणी सावधगिरीचे फलक लावावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

