इंदापूर: सहकार महर्षी श्रद्धेय स्व. शंकररावजी पाटील (भाऊ) यांच्या १०२ व्या जयंतीचे औचित्य साधून, विद्यार्थी सहाय्यक समिती, पुणे आणि शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने *'यशस्वी पालकत्व आणि उद्याचे तंत्रज्ञान'* या विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यशाळा आज संपन्न झाली. ट्रस्टच्या अध्यक्षा *श्रीमती पद्माताई भोसले* व सचिव *डॉ. गिरीश देसाई* यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर आयोजित या शिबिराला इंदापूर शहर तसेच परिसरातील पंचक्रोशीतून पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुलांच्या भविष्यासाठी पालकांनी सजग होणे ही काळाची गरज असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले.
या कार्यशाळेचे मुख्य आकर्षण म्हणजे पुण्यातील सुप्रसिद्ध मानसशास्त्रीय समुपदेशक *डॉ. स्नेहल महेशकर (Neuro Parenting Specialist)* आणि *डॉ. स्मिता जोशी* यांचे लाभलेले बहुमोल मार्गदर्शन. आजच्या धावपळीच्या युगात पालकांशी संवाद साधताना तज्ज्ञांनी प्रामुख्याने पौगंडावस्थेतील मुलांचे मानसशास्त्र, परीक्षेचे ताण-तणाव आणि मोबाइल-गॅजेट्सच्या वाढत्या व्यसनावर प्रकाश टाकला. 'पिढीतील अंतर' कमी करून मुलांशी मैत्रीपूर्ण नाते कसे निर्माण करावे, याचे व्यावहारिक दाखले देऊन पालकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. तुषार रंजनकर सर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन श्री. अरविंद गारटकर सर यांनी केले.
कार्यशाळेत आधुनिक तंत्रज्ञानावर विशेष भर देण्यात आला. भविष्यातील संधींचा विचार करता *AI (Artificial Intelligence)* म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर कसा करावा, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पालकांना दाखवण्यात आले. सायबर सुरक्षा आणि बदलत्या काळातील करिअरच्या निवडीमध्ये पालकांची भूमिका किती महत्त्वाची आहे, याचे सविस्तर विश्लेषण यावेळी करण्यात आले. तंत्रज्ञानाचा वापर केवळ मनोरंजनासाठी न करता तो अभ्यासाच्या आधुनिक पद्धतींसाठी कसा करता येईल, हे पालकांना समजावून सांगण्यात आले.
या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या गुरुजनांचा सन्मान करण्यात आला. इंदापूर तालुक्यातील विविध शाळांमधील ज्या शिक्षकांनी आपल्या अध्यापनातून आणि शिस्तीतून विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी करीत आहेत, अशा गुणवंत शिक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थी साहाय्यक समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अच्युतराव आपटे यांच्या माणसकन्या व ज्येष्ठ कार्यकर्त्या श्रीमती शशीताई भाटे, ट्रस्टचे खजिनदार श्री. तुषार रंजनकर, विश्वस्त श्री. अरविंद गारटकर, आरोग्य केंद्र प्रमुख श्री. महादेव चव्हाण, कोपिवरची शाळा प्रमुख श्री. भारत बोराटे, श्री. हमीद आत्तार, इन्चार्ज श्री. दिपक जगताप आणि प्रकल्प अधिकारी श्री. सागर कांबळे उपस्थित होते.
अल्फा बाईट कॉम्प्युटर्स येथे पार पडलेल्या या कार्यशाळेसाठी दोन सत्रांचे नेटके नियोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्नोत्तराचे सत्र रंगले, ज्यामध्ये पालकांनी विचारलेल्या शंकांना तज्ज्ञांनी शास्त्रोक्त उत्तरे दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी *श्री. अमोल राऊत, चारुशीला शिंदे, केदार गोसावी, त्रिशाला पाटील, रोहिणी जाधव आणि अथर्व सरवदे* यांनी विशेष परिश्रम घेतले. या यशस्वी आयोजनामुळे शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा गौरव सर्वत्र होत आहे.
