इंदापूर: इंदापूर तालुक्याचे भाग्यविधाते आणि सहकार महर्षी आदरणीय स्व. शंकरराव पाटील (भाऊ) यांची १०२ वी जयंती आज संपूर्ण तालुक्यात मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरी करण्यात आली. या निमित्ताने शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विविध सामाजिक व आध्यात्मिक उपक्रम राबवून भाऊंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले. सकाळी ट्रस्टच्या कार्यालयामध्ये मान्यवरांच्या हस्ते भाऊंच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाचा उत्साहात प्रारंभ झाला.
त्यानंतर, इंदापूर बाजार समितीमधील भाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. तसेच आय कॉलेज येथील समाधी स्थळी जाऊन सर्व उपस्थितांनी नतमस्तक होत पुष्पहार अर्पण केला. जयंती व महाशिवरात्रीचे औचित्य साधून समाधी स्थळी उपस्थित असलेल्या सर्व नागरिक, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना खिचडी व केळीचे वाटप करून सामाजिक ऋण जपण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या गौरवशाली कार्यक्रमास माजी मंत्री मा. हर्षवर्धनजी पाटील साहेब यांनी आपली विशेष उपस्थिती दर्शविली. यावेळी बोलताना त्यांनी भाऊंच्या दूरदृष्टीचे आणि कार्याचे स्मरण केले. त्यांनी आपल्या भाषणात शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या सध्याच्या कार्याचा गौरव केला. "संस्थेमार्फत राबविले जाणारे प्राथमिक आरोग्य केंद्, कोपिवरची शाळा त्यासोबतच कौशल्य विकास उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असून, यामुळे समाजातील वंचित घटकांना मोठी मदत मिळत आहे," अशा शब्दांत त्यांनी ट्रस्टच्या कार्याची प्रशंसा केली.
मा. हर्षवर्धनजी पाटील पुढे म्हणाले की, "भाऊंनी आयुष्यभर समाजहिताला प्राधान्य दिले. त्यांनी दाखवलेल्या समाजसेवेच्या मार्गावर चालणे आणि त्यांनी लावलेली ही रोपे जोपासणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल." ट्रस्टच्या वतीने राबवले जाणारे आधुनिक उपक्रम हे भाऊंच्या विचारांचीच शिदोरी असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले. त्यांच्या या मार्गदर्शनाने उपस्थितांमध्ये नवा उत्साह संचारला होता.
याप्रसंगी संस्थेचे खजिनदार श्री. तुषार रंजनकर सर, विश्वस्त श्री. अरविंद गारटकर सर, प्राथमिक आरोग्य केंद्र प्रमुख श्री. महादेव चव्हाण, कोपिवराची शाळा प्रमुख श्री. भारत बोराटे व श्री. हमीदभाई आत्तार, डॉ. सारंगी कुंभार, इन्चार्ज श्री. दिपक जगताप, प्रकल्प अधिकारी श्री. सागर कांबळे, श्री. अमोल राउत, त्रिशाला पाटील, रोहिणी जाधव, केदार गोसावी संस्थेचे सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन आणि शिस्तबद्ध अंमलबजावणीमुळे सर्व उपक्रम शांततेत आणि यशस्वीपणे पार पडले.
