इंदापूर (प्रतिनिधी): येथील नामांकित चेतना कॉलेज ऑफ फार्मसी आणि चेतना इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत दिमाखात साजरी करण्यात आली. या सोहळ्यानिमित्त संपूर्ण शैक्षणिक संकुलात चैतन्याचे वातावरण पसरले होते. संस्थेचे अध्यक्ष उदय देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
या मंगल प्रसंगी संस्थेचे सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने, सदस्य बाळासाहेब बोराटे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका निकिता माने यांची प्रमुख उपस्थिती होती. कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. महाराजांचे शौर्य, नेतृत्वकौशल्य आणि राष्ट्रप्रेम यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी जीवनात प्रगती करावी, असा संदेश त्यांनी आपल्या भाषणातून दिला.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे नर्सरीपासून ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवनावर आधारित ओघवती भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सुतार मॅडम यांनी सादर केलेल्या प्रेरणादायी गीतांनी आणि शिंदे सर यांनी मांडलेल्या महाराजांच्या शौर्यगाथांनी कार्यक्रमात रंगत आणली. अफजल खान वध, शाहिस्तेखानाची फजिती आणि पावनखिंडीचा ऐतिहासिक थरार या घटनांचे यावेळी प्रभावी वर्णन करण्यात आले.
या संयुक्त सोहळ्यासाठी दोन्ही संस्थांमधील सर्व प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सांघिक प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम अतिशय भव्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. शालेय स्तरावर अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक मूल्यांची जोपासना होत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमाचे नेटके नियोजन प्रांजली सुतार मॅडम यांनी केले होते. संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन मोरे मॅडम व गोळे मॅडम यांनी अत्यंत प्रभावीपणे केले, तर कार्यक्रमाच्या शेवटी शिंदे मॅडम यांनी सर्व उपस्थित पाहुणे, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले. या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

